अजित पवार लबाड लांडग्याच पिल्लू अन् सुप्रिया सुळे...; गोपीचंद पडळकरची जीभ घसरली

अजित पवार लबाड लांडग्याच पिल्लू अन् सुप्रिया सुळे...; गोपीचंद पडळकरची जीभ घसरली

मुंबई | Mumbai

राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. तसेच सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक, अशीही टीका पडळकर यांनी केलीय.

गोपीचंद पडळकर एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले, अजित पवार यांची भावना आमच्या विषयी स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिलंय, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

तसेच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली. ही लबाड लांडग्याची लेक बोलतोय. त्यावर फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापाने, तुम्ही, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे बघितलं नाही. तुम्ही जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आता आमची लोकं सगळी हुशार झाली आहेत. मुलं सगळी हुशार झाली आहेत. लोकांची त्यांच्या विषयीची भावना ही त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार काय बोलले, याला आम्ही काळीची किंमत देत नाहीत, असा घणाघात पडळकर यांनी केला.

दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी याआधीदेखील शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलीय. पण आता अजित पवार सत्तेत आहेत. असं असतानाही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे पडळकरांच्या टीकेवरुन नवा वाद निर्माण होण्यची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. पण त्यांनी अजित पवार यांना पत्र पाठवलं नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com