Sunday, May 5, 2024
Homeराजकीयमाथेफिरुंचे समर्थक म्हणून काम करु नका; आशिष शेलारांचा शरद पवार आणि संजय...

माथेफिरुंचे समर्थक म्हणून काम करु नका; आशिष शेलारांचा शरद पवार आणि संजय राऊतांवर हल्लाबोल

दिल्ली l Delhi

प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. मात्र यावेळी झालेल्या हिंसेमुळे या आंदोलनाला गालबोट लागलं. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका केली आहे.

- Advertisement -

आशिष शेलार मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले, जवान आणि पोलिसांच्या समर्थनार्थ शरद पवार यांची फेसबुक पोस्ट का पडली नाही? रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत? अशी संतप्त विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच जवान असो किंवा दिल्ली पोलीस या सर्वांनी जो संयम दाखवला तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना गोळीबार हवा होता का ? आंदोलन चिघळलं होतं का? त्यामुळे माथी भडकावण्याचं काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नाही,” असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.

‘हिंसाचार करणाऱ्यांविरोधात एक चकार शब्द काढला नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंडं आता का शिवली आहेत हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारत आहोत,’ असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने २०१४ पासून २०२० पर्यंत जनहिताचा निर्णय घेतला की लाँग मार्च ते आंदोलन, पुरस्कार वापसी ते पुरस्कार वापसी करणाऱ्यांचं समर्थन ही सातत्याने भूमिका या देशातील शहरी नक्षलवादी आणि खासकरुन मोदी विरोधकांनी घेतली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

‘केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे. देश यांना सोडणार नाही,’ असंही ते म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांशी चर्चा न करण्याच्या आरोपांवर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘कोर्टासमोर केसेस आहे. सुप्रीम कोर्टाचं आम्ही ऐकणार नाही, समितीसमोर जाणार नाही, समितीच्या सदस्यांवर आम्ही प्रश्न विचारु. तासनतास आणि कित्येक दिवस कृषीमंत्री नम्रपणे चर्चा करत असताना हेटाळणी केली जात आहे. हे सगळं कशाचं द्योतक आहे. त्यामुळे शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयमाची भाषा करु नये. माथेफिरुंचे समर्थक म्हणून काम करु नये. पोलिसांनी चौकशी जो दोषी असेल त्याला पकडावं. जो माथेफिरु असेल त्याच्या समर्थकांपर्यंतही पोहोचावं, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

दरम्यान हिंसाचारात काही भाजपाशी संबंधित लोकांची नावं समोर येत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “ज्यांचे स्वत:चे दामन रक्ताने माखले आहेत त्यांनी दुसऱ्यावर आरोप करु नये. जे सत्य आहे ते देशाने पाहिलं आणि बाकीचं सत्य चौकशीत समोर येईल. असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान आंदोलना दरम्यान, जमावाच्या हल्ल्यात आतापर्यंत 153 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबतीत आतापर्यंत 15 एफआयआर दाखल आहेत, ज्यामध्ये ईस्ट दिल्ली, द्वारका आणि पश्चिमी दिल्लीत 3-3 एफआयआर, 2 आऊटर नार्थ, एक शाहदरा आणि एक नार्थ जिल्ह्यात दाखल झाला आहे, ही संख्या वाढू शकते. दिल्लीच्या 6 जिल्ह्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये बंड, सरकारी संपत्तीचे नुकसान आणि हत्यार लुटण्याच्या कलमांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या