...तर रोहित पवारांवरही कारवाई करा

भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचा आंदोलनाचा इशारा
...तर रोहित पवारांवरही कारवाई करा

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

एकिकडे सरकार रुग्णांना सेवा पुरविण्यात कमी पडत असतांना माजी आ.शिरीष चौधरी यांनी नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी स्वखर्चाने रेमडिसिवीर इंजेक्शन आणून सवलतीच्या दरात वाटप केले.

तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे शिरीष चौधरींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करतात. मग तोच न्याय रोहित पवार यांच्याबाबतही करावा, त्यांनीदेखील अशाचप्रकारे इंजेक्शनचे वाटप केले आहे.

पवारांवरही कारवाई करण्यात यावी, अन्यथा भाजपातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.

श्री. चौधरी म्हणाले, सध्या कोरोनाचा कहर सर्वत्र वाढला आहे. मात्र, सरकार उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. दररोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे.

हे रोखण्यात सरकार अपयशी ठरले असतांनाच अमळनेरचे माजी आ.शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ.रविंद्र चौधरी यांनी स्वखर्चाने रेमडिसिवीर इंजेक्शन आणून सवलतीच्या दरात वाटप केले व लोकांचा जीव वाचवला यात कोणता गुन्हा केला?

लोकांना इंजेक्शन पुरविल्याबाबत चौधरी यांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री इंजेक्शनचा साठा करुन काळाबाजार करत असल्याचा आरोप करतात, हा कुठला न्याय आहे. सत्तेवर राहून जे काम नवाब मलिक यांनी केले पाहिजे ते चौधरी बंधुंनी केले.

सरकारच्या आडमुठेपणामुळे निरपराध लोकांचा मृत्यू होत आहे. हे पाप कुठे फेडणार? त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. शिरीष चौधरी यांनी स्वखर्चाने इंजेक्शन आणून ते वाटप केले असेल तर असाच प्रकार रोहित पवार यांनीदेखील आपल्या मतदार संघात केला आहे.

त्यांचीदेखील चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा भाजपातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री.चौधरी यांनी दिला आहे.

रुग्णालयांनी कमीत कमी बिल आकारावे

श्री.चौधरी पुढे म्हणाले, सध्या कोविड रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वच खाजगी हॉस्पिटलसह सरकारी रुग्णालयेदेखील फुल्ल आहेत. रुग्णांलयांमधील डॉक्टर, नर्स, सरकारी डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत.

रेमडिसिवीरचे इंजेक्शन आता कोविड सेंटरमध्ये उपलब्ध होवू लागले आहेत. मात्र, काही खाजगी रुग्णांमध्ये शासनाने दिलेल्या इंजेक्शनचेदेखील बिल रुग्णांकडून घेतले जात असून अव्वाचे सव्वा बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

म्हणूून डॉक्टरांनीदेखील रुग्णांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन कमीत कमी बिल आकारणी करावी, अशी मागणीही चौधरी यांनी केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारीण सदस्य संदीप चौधरी, निलेश माळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com