Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'मंत्री झाले राजे अन् प्रत्येक विभागात एक-एक वाझे'; फडणवीसांचा हल्लाबोल

‘मंत्री झाले राजे अन् प्रत्येक विभागात एक-एक वाझे’; फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मंत्री झाले एक-एक विभागाचे राजे अन् प्रत्येक विभागात एक-एक वाझे’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मृत्यूचं मॉडेल होतं, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. मुंबई बाहेरही महाराष्ट्र आहे याकडेही लक्ष वेधत सरकारला धारेवर धरलं.

- Advertisement -

फडणवीस बोलतांना म्हणाले की, ‘महाराष्ट्रात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. राज्याच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचाराने बरबटलेलं सरकार आहे. अशी अवस्था गेल्या ६० वर्षात पाहिली नाही. कुठल्याही सरकारमध्ये १ मुख्यमंत्री असतो, पण या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री समजतो, एक निर्णय घेतला जातो, तो तासाभरात रद्द होतो, मग दुसऱ्यादिवशी पुन्हा निर्णय घेतला जातो, सरकार आहे की सर्कस आहे?’ असा खोचक सवालही फडणवीसांनी विचारलाय.

तसेच, ‘करोना काळामध्ये महाराष्ट्राची काय अवस्था झाली. करोना काळात सरकारनं चांगलं काम केलं असं मंत्री आणि काही माध्यमं सांगतात. तेव्हा त्यांना सांगावसं वाटतं. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?. देशात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात होते. किड्या मुंग्यासारखे लोकं मेली. कुठलं मॉडेल आणलं आहे. यशाचं मॉडेल आणलं आहे. मॉडेल जर असेल तर मृत्यूच्या सापळ्याचं मॉडेल आहे. या मृत्यूंचं उत्तर कोण देईल?. उत्तर प्रदेशाच्या गंगा नदीत ५० मृतदेह सापडले. तर दोन दिवस महाराष्ट्रात बातम्या चालतात. बीड जिल्ह्यात २२ मृतदेह कोंबून एका गाडीत त्याची विटंबना केली जाते. त्या संदर्भात काही लोकं मात्र मौन आहेत. बोलत देखील नाहीत. हे मॉडेल आहे.’ असे म्हणत करोना काळातील महाराष्ट्र मॉडेलवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं.

त्याचबरोबर, आरक्षण रद्द होण्यासाठी राज्य सरकारचं पूर्णपणे जबाबदार असल्याचा ठाम दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना डिबेट करण्याचं आव्हान दिलं. ‘मी दाव्याने सांगतो. राज्यातील कुठल्याही मंत्र्याने माझ्याशी डिबेट करावी, ओबीसी आरक्षण रद्द व्हायरला केवळ आणि केवळ राज्य सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदर आहे. राज्य सरकारनं १५ महिने झोप काढली. मागासवर्गीय आयोगच नेमला नाही. त्यामुळे कोर्टानं आरक्षण रद्द केलं, असं फडणवीस म्हणाले. तसेच, ‘भाजप २६ तारखेचं आंदोलन करुन शांत बसणार नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येणार नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. आता हा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला नसेल जमत तर मदत मागा आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसींसाठी संघर्ष करु. पण जर ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नाही’ असंही देवेंद्र फडवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या