2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल - देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट निष्फळ?
 देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

पुणे | प्रतिनिधी| Pune

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या (BJP-MNS alliance) चर्चेला उधाण आले आहे. मात्र, विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections)आमचं एकच इंजिन असेल, असे विधान शनिवारी प्रसार माध्यमांशी केल्याने चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट निष्फळ ठरली का? असा सवाल उपस्थित होत आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर 2024 मध्ये भाजपचे एकच इंजिन असेल एवढे ध्यानात ठेवा, असे फडणवीस म्हणाल्यामुळे मनसे-भाजप युती (BJP-MNS alliance) होणार नसल्याची राजकीय (Political) वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही

दरम्यान, दिल्लीत भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले आहेत. तर पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते सोमवारी दिल्लीत जाणार आहेत. आपणही दिल्लीत जाणार आहोत असे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठीसाठी आम्ही दिल्लीला जात आहोत. तसंच महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी हा दौरा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचीही चर्चा नाही. चंद्रकांत पाटील चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कृपया कंड्या पिटवू नका, बातम्या कमी असतील तर मला सांगा, असं फडणवीस माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले.

त्याचबरोबर मातंग, बोरड, चर्मकार, वाल्मिकी सुदर्शन समाजापर्यंत आरक्षण पोहोचलं नाही. ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्गवारी करावी लागेल. आज आरक्षणानंतरही अनेक समाज मागे आहे. त्यामुळे दीर्घकाळ आरक्षण सुरु ठेवावं लागेल. जो वंचित समाज आजही आरक्षणापासून दूर आहे. त्यांना कशाप्रकारे मुख्य प्रवाहात घेता येईल याबाबत विचार सुरु असल्याचंही फडणवीस म्हणाले.

तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नको

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर काँग्रेसकडून ओबीसींच्या 30 टक्के उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्याबाबत विचारलं असता नाना पटोले काय म्हणाले हे ऐकलं नाही. मी त्यावर भूमिका मांडणार नाही. एवढंच सांगतो की भाजपची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत.

तेजस यांचं स्वागत

फडणवीस यांना तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचं सांगितलं गेलं. त्याचं त्यांनी स्वागत केलं. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनीही राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे. परंपरेने नेतृत्व येत असेल तर त्या नेतृत्वाकडे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्याही येतील, असं ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com