गुलाबराव पाटील सर्वात निष्क्रीय पालकमंत्री

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

एक ते दीड वर्षात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम बघितले तर समाधानकारक नाही.पालकमंत्र्यांनी फक्त बैठका आणि बैठकाच घेतल्या.त्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केले नाही. गुलाबराव पाटील हे जिल्ह्यातील सर्वात निष्क्रीय पालकमंत्री आहेत, असा टोला मारुन भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सोमवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत टीका केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देत दीपक सूर्यवंशी यांनी पालकमंत्री पाटलांवर निशाणा साधला.

सूर्यवंशी म्हणाले की,पालकमंत्री पाटील यांना नाचता येईना अंगण वाकडे ही मराठीतील म्हण लागू पडते. त्यांना त्यांच्या मतदार संघात काही कामे होत नाही.त्यामुळे काही तरी आरोप झाले की,आपोआप प्रसिध्दी मिळते.त्यामुळे ते आरोप करतात.

राज्यात भाजपची सत्ता असताना माजी मंत्री गिराश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्यामुळे 25 कोटींचा निधी मिळाला.

त्यावेळी मनपात खाविआची सत्ता होती. त्यानंतर मनपात भाजपची सत्ता आल्यानंतर 100कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला.त्यातील 41 कोटींच्या निविदा निघाल्या.58 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली. मात्र राज्यात सरकार बदलल्यानंतर ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे.त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सात दिवसात स्थगिती उठवावी, असे आव्हान सूर्यवंशी यांनी दिले आहे.

भाजपने ठराव केला म्हणून 61 कोटी निधी मंजूर

महापालिकेत भाजपची सत्ता असतांना आम्ही निधीसाठी ठराव केला म्हणूनच पालकमंत्र्यांनी 61 कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले. त्यावेळी महापौरांनी कधीही भेदभाव केला नसल्याचे स्पष्टीकरण सोनवणे यांनी दिले. माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांनी शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणला असल्याचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे- पाटील यांनी सांगितले. यावेळी गटनेते भगत बालाणी, विशाल त्रिपाठी, मनोज भांडारकर उपस्थित होते.

रस्ते करायचे की,मक्तेदारांचे भले करायचे

पालकमंत्री म्हणतात की,गिराश महाजन यांनी काय केले? तर गिरीश महाजन यांच्यामुळेच जळगावात मेडीकल कॉलेज आणि मोहाडी रस्त्यावरील 100 खाटांचे हॉस्पिटल सुरु झाले आहे. मग हा विकास नाही का असा सवाल दीपक सुर्यवंशी यांनी उपस्थित केला.डीपीडीसीतून मनपाला 61 कोटी मंजूर केले आहे से पालकमंत्री सांगतात. पालकमंत्री म्हणून ते त्यांचे कामच आहे.मात्र आता पावसाळा सुरु होईल.पावसाळ्यात रस्त्यांची कामे होतात का? त्यांना रस्ते कारयचे की,मक्तेदारांचे भले करायचे असा सवालही सुर्यवंशी यांनी उपस्थित केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *