भाजपतर्फे कोविड सेंटरला दूधवाटप

दरवाढीच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन : संकलन बंद करण्याचे आवाहन
भाजपतर्फे कोविड सेंटरला दूधवाटप

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोना संसर्गच्या काळात शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. दूध दरही कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासाठी 1 ऑगस्टला भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यभर दूध दरवाढीसाठी दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी कोविड सेंटरला दूध वाटप करण्यात येणार असल्याचे भाजपने जाहीर केले.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भाजप महायुतीने 21 जुलैला राज्यभर शासनाला दूध भेट देऊन 1 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. दूध दरवाढीसंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास 1 ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर व जिल्ह्यातील सर्व भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

दूध संकलित करणार्‍यांनी हित लक्षात घेऊन दूध संकलित करू नये व दूध वाहतूक करणार्‍या सर्व वाहतूकदारांनीही बंद काळात शेतकर्‍यांच्या हितास प्राधान्य देऊन दूध वाहतूक करू नये. दूध दर कमी झाल्यामुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांच्या भावना तीव्र असून प्रशासाने याची दखल घ्यावी. शेतकरी हितास प्राधान्य म्हणून सहकार्य करावे. पशुखात्याचे वाढलेल्या दरामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

शहर भाजपच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली कोविड सेंटरला दूध वाटप करण्यात येणार आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी संघटक सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, साहिल शेख, निपूर पुप्पाल आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com