Tuesday, April 23, 2024
Homeराजकीय...तर सभागृह चालू देणार नाही; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

…तर सभागृह चालू देणार नाही; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई l Mumbai

अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर इशारा दिला आहे.

- Advertisement -

भाजपानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारच्या आत वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही, असा थेट इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांच पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील बोलतांना म्हणाले, ‘सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवदन करावं, नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही’, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

तसेच, संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलताना ‘मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही’ असं म्हटलं होतं. त्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही.’ असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यवतमाळमधील रोहिदास चव्हाण नामक डॉक्टरांचा देखील उल्लेख केला. ‘नांदेडच्या पूजा चव्हाणचा गर्भपात यवतमाळमध्ये कसा झाला? आणि गर्भपात झाल्यापासून हे डॉ. रोहिदास चव्हाण कुठे गायब आहेत?” असा सवाल चंद्राकांच पाटील यांनी केला आहे. तसेच, ‘पूजा चव्हाणचा मृतदेह वानवडीच्या रुग्णालयात नेला. त्या परिसरात १५० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वानवडी पोलिसांनी या १५ दिवसांत काय केलं याचा अहवाल द्यावा. ज्या दोघांना पोलिसांनी पकडलं होतं, त्यांचं काय झालं? ऑडिओ क्लिप्सविषयी देखील प्रश्न उपस्थित होत आहेत’, असं देखील ते म्हणाले.

तसेच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. यावरून देखील पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘वाघ यांना आताच कसा त्रास द्यायला सुरुवात होतो. अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही. चित्राताई वाघिणी सारख्या आहेत. त्या घाबरणाऱ्या नाहीत. चौकशीची भीती दाखवून त्यांना तुम्ही गप्प बसवू शकणार नाही,’ असा हल्लाबोल त्यांनी ठाकरे सरकारवर केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या