Thursday, May 9, 2024
Homeराजकीयभाजपची ‘नातू पळवणारी टोळी’ सक्रीय

भाजपची ‘नातू पळवणारी टोळी’ सक्रीय

मुंबई | किशोर आपटे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संयमाने बोलण्यासाठी ओळखले जातात. व्यक्तिश: त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या मालिका झाल्या तरी कधी त्यांनी बोलताना तोल सुटू दिला नाही मात्र स्वत:च्या नातवाबद्दल विचारलेल्या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यानी नातवाची किंमत कवडीचीही नाही असे सांगून वावटळ उठवून दिली. त्यामागे पवारांची राजकीय तिरंदाजी असल्याचे जाणकार सावधपणे सांगत आहेत.

- Advertisement -

राजस्थानातले काँग्रेसचे फोडण्याचे लोटस ऑपरेशन फसल्यानंतर ‘अबकी बारी महाराष्ट्र की’ हे त्यांनी हेरले असल्याने भाजपाने ‘लोटस’ करण्यापूर्वीच भाजपचे आमदार फोडण्याची तयारी राष्ट्रवादीत सुरू असल्याची माहिती बाहेर येत आहे. राष्ट्रवादीने या फोडाफोडीच्या डावपेचांना राजकीय व्यूहरचनेचे गोंडस नाव देऊन “आमदारांची घरवापसी” अशी मखलाशीही करण्याची शक्यता सूत्रानी व्यक्त केली आहे. महत्वाचे म्हणजे भाजपमध्ये फोडाफोडी करून आमदारांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची “मूल्यवान” जबाबदारी कवडीपेक्षाही कमी किंमत असलेल्या नातवाच्या वडिलांकडे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास सरकार पाडण्याबाबत दावा केला जात आहे. त्यानंतर भाजपमध्ये राष्ट्रवादीतून गेलेल्या काही जण पुन्हा पक्षात परत येण्यासाठी आतूर असल्याचा नबाब मलिक यांनी दावा केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी तो खोडून काढला होता. त्यानंतरच्या दोन दिवसांत पार्थ पवार यांच्या निमित्ताने भाजप मधील नातू पळवणारी टोळी सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या नातवांना गळाला लावण्याची मोहिम राबविली होती. त्यात विखे पाटील, मोहिते पाटील, पिचड, निंबाळकर, पदमसिंह पाटील यांच्या घरातील तरूण नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश दिले होते. त्याच मालिकेत पार्थ पवार यांना पदवीधर मतदारसंघात उमेदवारी देवून भाजपचे आमदार बनविण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात येते.

मात्र, त्याला काटशह देण्यासाठी शरद पवार यांनीच आता राष्ट्रवादीच्या घरवापसी अभियानाच्या नावाखाली भाजपमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू करण्याची रणनिती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. कालपासून शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकांची सत्र सुरू आहेत. याबैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील महाआघाडीतील तीनही पक्षांचे राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पाहून भाजपमधून नेते आणि कार्यकर्ते फोडून राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यात पार्थ पवार आणि अजित पवार यांची भुमिका महत्वाची असेल!

भाजप फोडून नेते

कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची जबाबदारी कवडीपेक्षा कमी किंमत असणारे आणि अपरिपक्व नातवाचे, वडील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर असणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घाई घाईने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. केवळ दहा मिनिटे अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे मंत्रालयातून बाहेर पडल्या.

मतदारसंघातील कामासाठी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. काल शरद पवार यांनी पार्थ पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काल अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लवकर बाहेर पडले आणि शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. ही बैठक पूर्वनियोजित होती, तसेच अजित पवार नाराज नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी बैठकीनंतर दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या