मुंबई l Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम मेडिकल कॉलेजचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना अमित शहा यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर घणाघाती टीका केली आहे.

दरम्यान, भाजपानं मुख्यमंत्रीपदासह सत्ता वाटपात ५०-५० स्थान देण्याचं वचन दिलं होतं, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वचनावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी मौन आज सोडलं.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं', असं अमित शहा यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शहा म्हणाले.

पुढं बोलताना अमित शाह म्हणाले, “मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका झाल्या होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं. तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडून सत्तेत बसले. कलम ३७० हटवलं, घाबरत घाबरत म्हणतात आम्ही स्वागत करतो. राम मंदिर बनवण्याचा निर्णय होतो. तेव्हाही मी जाईल… जाणार नाही. काय झालं? आम्ही तर कधीच घाबरलो नाही. भाजपा सिद्धांतासाठी राजकारणात आलेली आहे. राजकारणासाठी सिद्धांत तयार करत नाही. मी शिवसेनेच्या मित्रांना सांगू इच्छितो की, तुम्ही सिद्धांतांसाठी आलेला नाहीत. बाळासाहेब गेले. आता राजकारणासाठी सिद्धांतांची तोडमोड सुरू आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेला चांगलं माहिती आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसते,” असं म्हणत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

तसेच, १३० कोटींच्या या देशात वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष होते. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वीक होतं. मात्र मोदींच्या नेतृत्वात ज्याप्रकारे करोनाशी लढाई केली आहे, त्याचे जगात स्वागत होते आहे. पायाभूत सोयीसुविधा आम्ही लॉकडाऊन काळात मंजूर केल्या. व्हेंटीलेटर, मास्क, पीपीई किट इथे बनत नव्हते. अवघ्या 10 महिन्यात आपण एक नंबर निर्यातक झालो आहोत. सर्वात जास्त रिकव्हरी भारतात आहे. मलाही कोरोना झाला होता, त्याचा काही लोकांना आनंदही झाला होता' असा टोलाही शहा यांनी विरोधकांना लगावला. तसेच 'वैद्यकीय क्षेत्राने जो लढा दिला त्यांचे अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आपले डॉक्टर्स व पॅरा मेडिकल स्टाफने जी लढाई लढली त्याला तोड नाही. आपण तयार केलेली लाईन ऑफ ट्रीटमेंट आज जगात स्वीकारली गेली आहे. जगात फक्त डॉक्टर आणि सरकार लढत असताना भारतात यासोबतच जनतेचे सर्व घटक या लढाईत उतरले, ७० % दुनियेतील वॅक्सिन भारत पुरवत आहे, वेगाने वॅक्सिनेशन होत आहे, असंही शहांनी डॉक्टरांचं कौतुक केलं.