
मुंबई | Mumbai
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती (Balasaheb Thackeray Birth Anniversary) आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जात आहे. शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळारही शिवसैनिक गर्दी करत आहेत.
दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. १.३३ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात… राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा ‘राज’कीय संवाद!, अशी पोस्ट करण्यात आलेली आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
राज ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला याची आठवण करून देणारा हा व्हिडीओ आहे. शिवसेनेमधून ज्यांनी-ज्यांनी बंड केलं त्यांच्यापेक्षा आपली भूमिका कशी वेगळी होती हेही या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
व्हीडिओमध्ये राज ठाकरे म्हणताना दिसतात की, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होते, मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावलं, माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं.”
याचबरोबर, “जेव्हा मुलाखतकाराने मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेंचं बंडं आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्यात. हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलेलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.” असंही राज ठाकरे म्हणले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले...
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि अमोघ वकृत्त्वाची देणगी लाभली होती. त्यांनी आपलं आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले होते, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज मुंबईतील विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आमंत्रण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना देखील देण्यात आले आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.