Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयजलगाव तो झॉंकी है, भुसावल अभी बाकी है...

जलगाव तो झॉंकी है, भुसावल अभी बाकी है…

भुसावळ – आशिष पाटील – Bhusawal :

जळगाव येथील महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता असतांना महापौर, उपमहापौर निवडणुकीत झालेल्या सत्तांतरानंतर महापालिकेवर शिवसेनेने आपली सत्ता काबिज करत भाजपाला झटका देण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

यामुळे शिवसेना कार्यकार्ते व पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आहे. या निकालानंतर शुभेच्छा फलक शहरात झळकत आहेत.

त्यातील एका फलकावर ‘जलगाव तो झॉंकी है, भुसावल अभी बाकी है|’ असा आशय झळकत असून स्थानिक पालिका सत्ताधार्‍यांना शिवसेनेकडून आपली ताकद दाखवून देण्याचे नियोजन सुरु असल्याचे या निकाल व शुभेच्छा फलकावरुन दिसत आहे.

येथील पालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांपैकी एकमात्र उमेदवार मुकेश गुंजाळ हे निवडणुकीत निवडून आले होते.

त्या पलिकडे शिवसेनेची ताकद शहरात दिसून आली नाही. शिवाय वरणगाव पालिकेत काही नगरसेवक तर पंचायत समितीवर एक सदस्य ऐवढीच शिवसेनेची ताकद सध्या आहे.

मात्र, जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत झालेल्या खेळीमुळे भाजपाच्या हातातील सत्ता आपल्या हाती आणण्यात शिवसेनेला यश आले असून महापालिकेवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

या निकालाने शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्या अनुशंघाने या निकालाच्या समर्थनार्थ स्थानिक शिवसेनेने येथील जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स समोरील रेल्वेच्या संरक्षण भिंतीजवळ लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावर ‘ गुलाबभाऊ तुम्ही करुन दाखवल’ ‘जलगाव तो झाकी है भुसावल अभी बाकी है’ अशा आशयाचे फलक झळकत आहे.

या फलकावर विजयी उमेदवारांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. महापालिकेतील सत्तांतर व महापालिकेवर पहिल्यांदाच भगवा फडकविल्याचे श्रेय पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे.

शिवसेनेत निर्माण झालेल्या या उत्साहामुळे आगामी काळात भुसावळ पालिकेत ही शिवसेना मुसंडी मारेल असा आत्मविश्‍वास शिवसेनेमध्ये निर्माण झाला आहे.

मात्र या विजयाचा टेम्पो शिवसेना भुसावळ व वरणगाव पालिका निवडणुकीपर्यंत कसा टिकवून ठेवते. कितपत सीट आपल्या पदरात पाडून घेते. तसेच विद्यमान सत्ताधारी भाजपा ही शिवसेनेला रोखण्यासाठी आणखी काय क्लुप्त्या करते की जळगाव महापालिकेचे उट्टे भुसावळात काढणे हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मात्र शिवसेनेला भुसावळचा गड गाठणे सध्यातरी कठिणच आहे. त्यामुळे आगामी काळातील शिवसेनेची भुमिका ही महत्वाची ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या