ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे फलक फाडले; जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर आरोप, म्हणाले...

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे फलक 
फाडले; जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर आरोप, म्हणाले...

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. तसेच शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले होते. त्यानंतर आज जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापले आहे...

शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी ठाकरे गटाच्या मुंब्रा येथील शाखेवर बुलडोजर फिरवला होता. त्यानंतर याप्रकरणी त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रॅली न काढणे, सभा न घेणे, आंदोलन न करणे अशा सर्वच गोष्टींवर किणे यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेचशिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना देखील ही नोटीस बजावण्यात आली असून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते हे एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत.

दुसरीकडे मुंब्रा येथे उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे फलक फाडण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. हे फलक फाडल्याचे व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'एक्स' (ट्वीटर) अकाउंटवर शेअर केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील, अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी, 'असे काहीही होणार नाही. आपण निश्चिंत रहा. आमची सर्वत्र नजर आहे' असे मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते, असे ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "आज उद्धव ठाकरेंचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने बॅनर शहरात लावलेले होते. यातील ९० टक्के बॅनर आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक बॅनर फाडायला किमान १५ मिनिट तरी लागतात आणि 'सर्वत्र नजर असणाऱ्या' पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, 'उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..! असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशन आणि ठाणे पोलिसांचे आभार मानतो. ते 'त्यांची ड्युटी' मोठ्या निष्ठेने करत आहेत. 'मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो मंजुरे खुदा होता हैं..!,' " अशी शायरीही जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com