मोदी सरकारचा हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न
राजकीय

मोदी सरकारचा हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न

ना.बाळासाहेब थोरात यांचा आरोप

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नात आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी 1942 च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे, त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी म्हटले आहे. congress

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढा असणार्‍या ऑगस्ट क्रांती लढ्याला 9 ऑगस्टला 78 वर्ष पूर्ण झाली यानिमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदी नेते,काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, 1942 रोजी आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून अंग्रेजो चले जावो, भारत छोडो चा नारा दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जात, धर्म, प्रांत विसरून देशातील लाखो लोक या लढ्यात सहभागी झाले व देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी या देशात लोकशाही रूजवली व वाढवली. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1942 च्या लढ्याला विरोध केला.

त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून या देशातील लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता आणि पैशाचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर विरोधी पक्षांना संपवण्यासाठी केला जात आहे. जाती, धर्माच्या आधारे देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता यांच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा 1942 च्या लढ्याप्रमाणे लढा उभारून धर्मांध, जातीयवादी भाजपला चले जावो सांगण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे थोरात म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com