शरद पवार – बाळासाहेब थोरात भेटीत काय झाले ?

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई / प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने राज्य सरकारच्या अखत्यारीतील महामंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुका करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याचे समजते.

या भेटीमुळे महामंडळ, समित्या, प्राधिकरणावरील नियुक्त्यांचा मुहूर्त लवकरच निघणार असल्याचे सांगण्यात येते.

आघाडी सरकारमध्ये महामंडळांच्या नियुक्त्या बाकी आहेत. राज्य पातळीवर समित्यांचे गठन बाकी आहे. प्राधिकणांवरील नियुक्त्या रखडलेल्या आहेत. यासंदर्भात आज पवार यांच्याशी चर्चा केली. याशिवाय राज्यातील प्रमुख प्रश्नावर चर्चा झाल्याचे थोरात यांनी भेटीनंतर सांगितले.

राज्यात महामंडळांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. या महामंडळाच्या अध्यक्षांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा आहे. मंत्रिपद न मिळालेले आमदार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते महामंडळ मिळवण्यासाठी आग्रही असतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लगेच कोरोना संकट आले. त्यात दीड वर्षे गेल्याने महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

राज्यातील आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या महामंडळांवरील नियुक्तीच्या याद्या तयार आहेत. मात्र, या नियुक्त्या जाहीर करण्याचा मुहूर्त सरकारला अजून सापडलेला नाही. आता थोरात यांनी पवारांची भेट घेऊन त्यावर चर्चा केल्याने यातून मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *