वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; बाळासाहेब थोरांताचा निर्णय

वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; बाळासाहेब थोरांताचा निर्णय

मुंबई | Mumbai

देशभरात कोरोना लसीकरणाचा मोठा व तिसरा टप्पा १ मे पासून सुरु होत आहे. राज्यातही लवकरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं करोना लसीकरण करण्यात येणार आहे.

या वयोगटाचं लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याचा निर्णय कालच ठाकरे सरकारनं घेतला. मात्र या लसीकरणामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपलं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज केली. त्याचबरोबर मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचं एकमत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच, देशात आणि राज्यात करोनाच गंभीर संकट आहे. या परिस्थितीला आपण सामोरं जात आहोत. लसीकरण बाबत आग्रही आहोत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोफत लसीकरणाचा आग्रह होता. याबद्दल महाआघाडीचे देखील एक मत होतं. लसीकरणासाठी राज्याला मोठा खर्च आर्थिक भार येणार आहे. पण, लसीकरण खर्चाबाबत नवा अतिरिक्त कुठलाही कर लावणार नाही,असं बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले.

तसंच, 'माझं एक वर्षाचा मानधन मी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. माझ्या काँग्रेसच्या सर्व आमदारांचा एक महिन्याच्या पगार मुख्यमंत्री निधीला देणार आहे, अशी माहितीही थोरात यांनी दिली.

त्याचबरोबर, अमृत उद्योगात एकूण पाच हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या लसीकरणाचा खर्चही आम्ही उचलणार असून हा पैसा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. मात्र राज्यात मात्र लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं १ मेपासून राज्यात लसीकरण सुरु होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. तसेच मोफत लस सरकारी रुग्णालये किंवा आरोग्य केंद्रांवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com