
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
तुम्ही सुरातला गेला, पुढे गुवाहाटीला गेला आणि नंतर गोव्याला गेलात. या काळात तुम्ही बंदूक मात्र आमच्या खांदयावर ठेवली याचे वाईट वाटते, अशी खंत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरील भाषणात व्यक्त केली.
मी खूप सरकार पाहिली आहेत. एका पक्षाचे सरकार असले तरीही अडचणी, तक्रारी असतात. आमदारांच्या कुरबुरी असतात. कामासाठी दबाव असतो. पण या सर्व तक्रारी आम्ही संयमाने घेतल्या. आम्ही टोकाची भूमिका कधीच घेतली नाही. बंडखोरी करताना एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्याबद्दल नाराजी व्यक्त करताना तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवायला नको होती, असे थोरात म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात मी यांना घेऊन परत आलो असा उल्लेख केला होता. त्याचा उल्लेख करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, असे तुम्ही देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणायचे. पण तुम्ही असे परत याल, असे कधी वाटले नव्हते, असा टोला लगावला.
उध्दव ठाकरेंचे जागतिक पातळीवर कौतुक
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांचा आढावा बाळासाहेब थोरात यांनी घेतला. अडीच वर्षात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. करोनाचे जागतिक संकट असतानाच तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काम करीत होते. त्यांनी केलेल्या दोन वर्षाच्या कामाचे कौतुक जागतिक पातळीवर करण्यात आले याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.