Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'जिथे भेळ, तिथे खेळ'; गिते, बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावर नांदगावकरांची टीका

‘जिथे भेळ, तिथे खेळ’; गिते, बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावर नांदगावकरांची टीका

मुंबई | Mumbai

शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. माजी आमदार वसंत गिते व नाशिकमधील स्थानिक नेते सुनील बागुल यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना-मनसे-भाजप आणि पुन्हा शिवसेना असा प्रवास करणाऱ्या या नेत्यांनी यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या काही नेत्यांवर टीका केली होती. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

- Advertisement -

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हंटले आहे की, “2 दिवसांपूर्वी नाशिक येथील काही “अतिशय मोठे” नेते बोलले कि नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच “मोठे नेते” आहेत ज्यांनी मनसे ची चलती असतांना सेना सोडली, भाजप ची सत्ता असतांना मनसे सोडली, सेने ची सत्ता असताना परत भाजप सोडली. एवढ्या “निष्ठावंत” नेत्यांवर काय बोलणार. यांचे ‘जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो. शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणे राजकीय जीवनात कायमच टाळत आलो, परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाही म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते. त्यांना खुप शुभेच्छा व एकच मैत्रीपूर्ण सल्ला आता तरी गेल्या घरी सुखी राहा” अशी टीका त्यांनी केली आहे.

वसंत गिते व सुनील बागुल हे मूळचे शिवसैनिक. मनसेची स्थापना झाल्यानंतर गिते यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते आमदार म्हणूनही निवडून आले. मात्र, मनसेचा राजकीय जोर ओसरताच त्यांनी भाजपला जवळ केले. पाठोपाठ सुनील बागुलही भाजपमध्ये गेले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या