
मुंबई | Mumbai
'५० खोके'च्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादावर आमदार रवी राणांकडून तरी पडदा टाकण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्यानंतर रवी राणांनी विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.
आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर बच्चू कडू यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधला. कडू यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. आज संध्याकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांची बैठक आहे. अमरावतीला त्यानंतर मंगळवारी उद्या मी भूमिका जाहीर करणार आहे. मी काही अयोग्य केलं असं मला वाटत नाही. माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न या आरोपांमुळे निर्माण झाला होता. त्यामुळे भूमिका घेणे महत्त्वाचे होते. उद्या बैठकीत कार्यकर्ते काय भूमिका घेतील यावर माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
रवी राणा काय म्हणाले?
'गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता, शब्दाशब्दांमधून वाद सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत साडेतीन तास बैठक झाली. जे काही वाद झाले, जे काही शब्द वापरले गेले त्यावरून वाद झाला होता. ते शब्द मी मागे घेतो. आता बच्चू कडू आणि मी अमरावतीचे आमदार आहोत. बोलता बोलता तोंडातून जे काही गुवाहाटीबद्दल निघालं, शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार, नेते, सहकारी आहे, ते सगळे आमच्या सोबत आहे. त्यामुळे गुवाहाटीबद्दल काही बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो' अशा शब्दांत रवी राणांनी यू-टर्न घेतला.