Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडूंची खोचक टिप्पणी; म्हणाले...
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार (Ajit Pawar) हे आमचेच नेते आहेत असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले. यानंतर आज बारामती (Baramati) येथे बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीही याला दुजोरा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. हा प्रतिक्रियांचा धुरळा सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी त्यात उडी घेतली आहे.
काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राल खुळ्यात काढत आहेत असे वाटतेय का? असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला असता बच्चू कडू म्हणाले की, वाटतेय काय, आता तो काय प्रश्न आहे? म्हणजे हे तर सुर्य प्रकाशाइतके सत्य आहे. यात प्रश्न विचारायची गरजच काय, असे उत्तर बच्चू कडू यांनी दिले आहे.
जास्त लक्ष दिले तर डोके फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडले तसे इथे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
तर, व्होटर सर्व्हेवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, सामान्य माणसांच्या तोंडचे वाक्य आणि काही पक्षांनी केलेले सर्व्हे यात जमीन आसमानचा फरक आहे आणि या घटनेनंतर जनता अचानक धक्का देखील देऊ शकते, असेही बच्चू कडू म्हणाले. सगळे सर्व्हे बोगस आहेत, जी वस्तुस्थिती असेल ती मतदानाने समोर येईल. सर्व्हेतर मागच्या वेळी मी २० हजार मतांनी पडणार असे सांगितले होते, पण मी १० हजार मतांनी निवडून आलो. त्यामुळे सर्व्हेला काही किंमत नसते.