औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवायला आ. चव्हाण कारणीभूत; माजी आ. चिकटगावकरांचा थेट आरोप

औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवायला आ. चव्हाण कारणीभूत; माजी आ. चिकटगावकरांचा थेट आरोप

वैजापूर | प्रतिनिधी | दिपक बरकसे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपवण्यासाठी आमदार सतीश चव्हाण हे सक्रिय झालेले असून आतापर्यंत त्यांनी पैठण आणि कन्नड तालुक्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट निर्माण केले होते, असा आरोप वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रताप निंबाळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकर पवार, प्रशांत शिंदे, साईनाथ मतसागर, उत्तम काका निकम, अशोक मस्के, प्रेम राजपूत यांची उपस्थिती होती...

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब काका ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, नगरसेवक उल्हास ठोंबरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुंबई येथे प्रवेश केला. या पक्षप्रवेशाला सहा महिन्यापासून माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा विरोध होता. सलग तीन वेळेस त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यात चिकटगावकर यांना यश आले होते. परंतु ठोंबरे परिवाराने सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून मुंबई येथे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलयांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आज चिकटगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सतीश चव्हाण यांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचा आरोप केला. मी पराभूत आमदार नसून आजही विजयी आमदार आहे असे त्यांनी सांगितले.

मी दोन वेळेस अपक्ष निवडणूक लढवून जनतेने माझ्यावर प्रेम दाखवून मला जवळपास 50 हजार मते दोन्ही वेळेस दिली होती. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर मी गोरगरीब जनतेची सेवा करण्यास तसेच त्यांचे कामे करण्यास सुरुवात केली. वैजापूर तालुक्यामध्ये सर्वात प्रथम मी जनतेच्या हक्काचे पाणी गणथडी भागात आणले. तसेच वैजापूर तालुक्यामध्ये विजेची समस्या खूप मोठे असल्याकारणाने मी गावोगावी डीपी बसून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती उमेदवारी घेऊन विजयी झालो. हे सर्व मी जनतेच्या आशीर्वादाने केलेले आहे.

पंधरा दिवसात जनतेला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेणार

गेल्या सहा महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते पंकज ठोंबरे यांना पक्षांमध्ये घेण्यासाठी उत्सुक होते. माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा त्यांना स्पष्ट विरोध होता. तरी देखील पक्षश्रेष्ठींनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील आम्ही त्यांना मदत केली आणि निवडून आणले आणि त्यांनी पंचायत समिती उपसभापतीच्या वेळेस विरोधात जाऊन मतदान केले. अशा लोकांना पक्षांमध्ये घेऊ नका असे मी वारंवार पक्षश्रेष्ठींना सांगत होतो. त्यामुळे मी आता जनतेमध्ये जाऊन जनतेला विचारणार मी काय निर्णय घेऊ. ज्या जनतेने मला आमदार केले त्या जनतेला जाऊन मला विचारावा लागेल. त्यामुळे मी पंधरा दिवसात योग्य तो निर्णय घेणार असल्याचे चिकटगावकर यांनी सांगितले.

ठोंबरे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढणार का?

मी गावोगाव खेडेवाडी जाऊन जयंतीची कामे केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला. परंतु काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कसले तरी आमिष दाखवून पंकज ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घ्या असे वाटत होते. त्यांनी जर सर्वप्रथम येऊन माझ्याशी चर्चा केली असती तर मी नक्कीच विचार केला असता असे चिगटगावकर म्हणाले आणि ठोंबरे राष्ट्रवादी मध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष वाढणार का असा देखील त्यांनी प्रतिप्रश्न केला.

या पत्रकार परिषदेला उपसभापती प्रभाकर बापू बारसे, रिखबशेठ पाटणी, राजेंद्र साळुंखे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष युसूफ भाई, बाळा जाधव, अकबर भाई, रवींद्र निकम, सुनील खांडगौरे, संदीप कुंदे, मंजाहारी गाढे, राजू नाना, मगर अमोल बावचे, सागर गायकवाड, लखन त्रिभुवन, प्रदीप चंदने, अब्दुल बागवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com