आश्वी |वार्ताहर| Ashwi

शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील 14 ग्रामपंचायतींबरोबर संगमनेर तालुक्यातील तब्बल 94 ग्रामपंचायतीचा निवडणूक बिगूल वाजल्यामुळे

तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया निवडणुकीनतंर होणार असल्याने सरपंच पदाची स्वप्नं पडणार्या गावपुढार्यांची घुसमट होताना दिसते आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आश्वी परिसरातील 14 गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सत्ता संघर्ष पहावयास मिळणार असल्याने विखे व थोरात गटातील वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे.

शिर्डी मतदार संघातील मुदत संपलेल्या कनोली, पिंप्री लौकी आजमपूर, चिंचपूर खुर्द, चणेगाव, झरेकाठी, पानोडी, प्रतापपूर, शेडगाव, ओझर बुद्रुक, औरंगपूर, खळी, दाढ खुर्द, शिबलापूर व मनोली या 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची जोरदार तयारी निवडणूक प्रशासनाने सुरू केली आहे.

निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध झाली असून 23 ते 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज भरणे, 31 डिसेंबर रोजी छाननी, 4 जानेवारी रोजी अर्ज माघारी व चिन्ह वाटप केले जाणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तसेच निकालाची अधिसूचना 21 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीनतंर आलेल्या करोना संकटामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलत या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. हळूहळू करोनाचे संकट निवळू लागल्यामुळे शासनाने रेंगाळलेल्या निवडणुका जानेवारी 2021 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आश्वी परिसरात पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूमंत्री ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यकर्ते हे सत्ता वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी करणार असले तरी कधी नव्हे ते विखे पाटील सत्तास्थानी नसल्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मरगळ आल्याचे चित्र आहे. तर राज्यातील या दोन्ही दिग्गज नेत्यांची ताकद व यंत्रणा कामाला लागल्यामुळे कडाक्याच्या थंडीत गावागावांत वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

थोरात-विखे समझोता एक्सप्रेस व सत्ता संघर्ष..

शिर्डी मतदार संघातील पिंप्री लौकी आजमपूर, कनोली या दोन गावांमध्ये ना. थोरात व आ. विखे पाटील गटाची समझोता एक्सप्रेस कार्यान्वित असून चणेगाव येथे बहुमत असतानाही आरक्षणामुळे विखे गटाकडे सरपंचपद आहे. तर पानोडी, शिबलापूर, खळी, मनोली, कनोली, चणेगाव या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची निवडणूक होणार असल्याने सत्ता संघर्ष पाहवयास मिळणार आहे. दरम्यान होऊ घातलेल्या 14 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतींवर विखे गटाचे तर 3 ग्रामपंचायतींवर थोरात गटाचे सध्या वर्चस्व आहे.