Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकिडनॅपिंग अन् वसुली; 'ते' व्हिडीओ दाखवत नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

किडनॅपिंग अन् वसुली; ‘ते’ व्हिडीओ दाखवत नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

मागील महिन्याभरापासून आर्यन खान (Aryan Khan) आणि क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण (cruise drug party case) चर्चेमध्ये राहिलं आहे. आता या प्रकरणामध्ये दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत आणि त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काही दिवसांपूर्वी दिवाळीनंतर फटाके फुटणार असे संकेत दिले होते. त्यानुसार आज पत्रकार परिषद घेऊन क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवीन गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisement -

आर्यन खान स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नाही तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेले. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) याला अडकवण्यात आलं असून हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि वसुलीचा आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात मोहित कंबोज (mohit kamboj) हा मास्टरमाईंड असल्याचा दावाही नवाब मलिकांनी केला आहे.

तसेच मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला क्रूझवर नेण्यात आले. त्यानंतर किडनॅप करुन 25 कोटींची मागणी करण्यात आली. डील 18 कोटींवर फायनल झाली. त्यापैकी 50 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, एका सेल्फीने त्यांचा संपूर्ण खेळ बिघडवला. किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज आहे. वसुलीत मोहित कंबोज (भारतीय) हा वानखेडेंचा साथीदार आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं.

काल (शनिवार) संध्याकाळी विजय पगारे नावाच्या एका व्यक्तीने सुनील पाटील नावाच्या व्यक्तीचा या संपूर्ण प्रकरणातला महत्त्वाचा सहभाग असल्याचा घटनाक्रम सांगितला. त्यावर बोलतांना नवाब मलिक म्हणाले, ‘माझ्याकडे विजय पगारेही आले होते. त्यांनी लीला हॉटेलमधल्या काही गोष्टी मला सांगितल्या. मनीष भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसुजा द ललित हॉटेलमध्ये तिथे मजा करायचे. वानखेडेंना वाटलं की ही गोष्ट उद्या सांगितली जाणार आहे तर कंबोजच्या माध्यमातून आधीच सांगुयात. म्हणून काल पत्रकार परिषद घेण्यात आली,

तसेच ‘सुनील पाटीलला मी आयुष्यात कधी भेटलो नाही. तो राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता नाही. सुनील पाटीलचे अमित शाहांसोबतचे अनेक व्हिडीओ फिरत आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळचे फोटो आहेत. मनीष भानुशालीचे पंतप्रधानांपासून सर्वांसोबत फोटो आहेत. सुनील पाटील देखील फ्रॉड आहे. सुनील पाटील देखील वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. ६ तारखेला माझ्या पीसीनंतर सुनील पाटीलचा फोन आला होता. मी तुम्हाला पत्रकार परिषदेसंदर्भात अधिक माहिती देऊ इच्छितो असं त्याने सांगितलं. दुसऱ्या पत्रकार परिषदेनंतर देखील त्यांनी फोन केला. मी त्याला मुंबईत येऊन पोलिसांना सर्व सांगायला सांगितलं. तो येणार होता, पण आला नाही’, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

दरम्यान, पत्रकार परिषदेआधी नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. सॅनविलने व्ही व्ही सिंह यांच्याकडे घरी नोटिस पाठवल्याबाबत विचारणा केली. यावेळी सॅनविलने तब्येत बरी नसल्याने मी सोमवारी एनसीबी कार्यालयात येऊ का? अशी विचारणा केली. त्यावर सिंह यांनी सोमवारी नको मग तू बुधवारी ये असे म्हटले. तसेच तुझा मोबाईल घेऊन ये. माझ्याकडे तुझा आयएमआय नंबर आहे. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय असे म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या