शेतकऱ्यांनी अहंकारला झुकवलं; मोदींच्या घोषणेनंतर राहुल गांधींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ

शेतकऱ्यांनी अहंकारला झुकवलं; मोदींच्या घोषणेनंतर राहुल गांधींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ

दिल्ली l Delhi

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित (PM Narendra Modi Address Nation) केले आणि यादरम्यान त्यांनी मोठी घोषणा करत नवीन कृषी कायदे मागे (New Agriculture Laws) घेण्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशातील अन्नदाता शेतकऱ्याने आपल्या आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या. अन्यायविरुद्धच्या या विजयाबद्दल शुभेच्छा... असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

तसेच, राहुल यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मला अभिमान वाटतो, मी या आंदोलनास पूर्णपणे समर्थन देत आहे. मी शेतकऱ्यांसोबत असून पंजाबमध्ये जाऊन हा मुद्दा उपस्थित करणार आहे. तर, सरकारला हे तीन कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू, असे राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com