केदार दिघे यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची नेमणूक
केदार दिघे यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

शिवसेनेतील ( Shivsena ) बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील ( Thane District ) पक्ष संघटनेला नवी उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ठाण्यातील नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानुसार शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे ( Kedar Dighe )यांची शिवसेनेचे ठाणे जिल्‍हाप्रमुख म्‍हणून तर महिला नेत्या अनिता बिर्जे यांची उपनेत्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा ठाणे हा बालेकिल्‍ला आहे. ठाणे जिल्‍हयात मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे शिवसेनेला जबर फटका बसला आहे. ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना समर्थन दिले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना शह देण्यासाठी ठाकरे यांनी आज नव्या नेमणुका घोषित केल्या.

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आज दुपारी केदार दिघे, अनिता बिर्जे तसेच शेकडो शिवसैनिकांसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या नियुक्‍त्‍या जाहीर करण्यात आल्‍या. दिघे यांच्यासोबतच प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहरप्रमुखपदाची तर चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्‍तेपदावर नियुक्‍ती करण्यात आली आहे.

आनंद दिघे यांच्या मृतयूनंतर एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. शिंदे यांनी ही जबाबदारी पार पाडताना संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामी त्यांच्या बंडाचा ठाणे जिल्‍हयातील शिवसेनेला जबर फटका बसला आहे. त्यामुळे पक्ष संघटना सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नव्या दमाच्या शिलेदारांवर विश्वास टाकला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com