Tata Air Bus नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Tata Air Bus नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून एकामागून एक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. काही दिवसांपूर्वीच दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ऐनवेळी गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरात प्रस्तावित असेलला टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातच्या वडोदऱ्यात हलवण्यात आला आहे.

अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला (Hyderabad) गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. 'आम्ही प्रकल्प आणले, असं सांगून त्यांनी यादी दिली. परंतु ते प्रकल्प कुठल्या काळामध्ये आले, हे पाहिलं पाहिजे. जुन्याच प्रकल्पांची यादी देणं हास्यास्पद आहे.' असं सुळे म्हणाल्या. 'मोठे प्रकल्प राज्याबाहेर जातात, ही गंभीर बाब आहे. पुढच्या वेळेला यापेक्षा मोठा प्रकल्प आणू, असं सांगून लॉलिपॉप दिलं जातंय. तेही प्रकल्प आणा आणि हेही प्रकल्प टिकवा.' असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.

ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'गुजरातमध्ये भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येत आहेत. राज्यात वेदान्तचा प्रकल्प येईल, अस छातीठोकपणे मुख्यमंत्री बोलले होते. मात्र, तसं झालं नाही. एअरबसच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आणि आता जखमीवर मीठ चोळणारी घटना म्हणजे सॅफ्रन कंपनीही हैदबादला जात आहे, त्यामुळे आता राज्य सरकारने महाराष्ट्राला ‘जय महाराष्ट्र’ करत सत्तेतून बाहेर पडावे', अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे. 'राज्यातील डबल इंजिनच्या सरकारचे एक इंजिन फेल असून ते सध्या उलटा प्रवास करते आहे. एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल तर आपण समजू शकतो. मात्र, हे सातत्याने होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस हे सरकार चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा', अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com