'महाविकास'ची वर्षपूर्ती : देवेंद्र फडणवीसांकडून सरकारवर जोरदार टीका

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांवर घणाघाती केली टीका

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली.

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे की, "आज आम्ही महाविकासाघाडीच्या एक वर्षाच्या कारभाराची पोलखोल करणार आहे. नुकतंच ठाकरे सरकारच्या 1 वर्षाच्या कामाची कार्यपुस्तिका म्हणजे काल न्यायालयाचे दोन निर्णय आले. त्यातील एक अर्णव गोस्वामी आणि दुसरा कंगना रनौतप्रकरणाचा होता. अर्णव गोस्वामी किंवा कंगना यांच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही, पण विरोधी विचारुन चिरडून टाकायचं याच्याशी तर आम्ही बिलकूल सहमत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला चपराक लगावली, आता कोर्टाला तुम्ही देशद्रोही ठरवणार का? असा प्रश्न भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

'अर्णव गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केलीय, कायद्याचा गैरवापर, किंवा सूडबुद्धीने करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. कंगना प्रकरणातही महापालिका आणि राज्य सरकारला चपराक लगावली आहे. अर्णव आणि कंगनाबाबत दोन्ही निर्णय म्हणजे कायद्याचा गैरवापराची उदाहरणे आहेत हे कोर्टाने दाखवलं आहे. हे दोन्ही निकाल आल्यानंतर कारवाई कुणावर होणार? गृहमंत्र्यांवर होणार की मुख्यमंत्री माफी मागणार? अधिकाऱ्यांनी गैरवापर केला तर त्यांच्यावर कारवाई होणार का?' असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

'मुख्यमंत्र्यांची मुलाखत टीका टिपण्णीत गेली, महाराष्ट्राच्या इतिहास इतकं धमकावणारे मुख्यमंत्री यापूर्वी पाहिले नव्हते, मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकलं होतं, गेल्या 5 वर्षात पाहिलं, पण दसऱ्याचं भाषण आणि कालची मुलाखत, मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणारी नाही,' असेही फडणवीस म्हणाले.

'पाच वर्ष सरकार चालवणार असे हे म्हणतात. तुम्ही चालवा पण 1 वर्षात काय दिसलं? हे सरकार जनतेचा विश्वासघात करुन आलेलं आहे. माझ्याकडे 2 पानांची यादी आहे, या सरकारने केवळ स्थगिती देण्याचं काम केलं, कोरोनाकाळात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं,' असेही फडणवीस म्हणाले.

'करोनाच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला, तो आम्ही उघडा पाडणार आहे. कोरोनाच्या काळात लूट करण्यात आली त्याची पोलखोल करु,' असेही फडणवीसांनी सांगितले. 'मुख्यमंत्रिपदाबाबत न दिलेलं वचन लक्षात आहे, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन लक्षात नाही? शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय?' असा प्रश्नही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com