Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याअंधेरी पोटनिवडणूक : लढायचं की मागे फिरायचं? भाजप काय निर्णय घेणार?

अंधेरी पोटनिवडणूक : लढायचं की मागे फिरायचं? भाजप काय निर्णय घेणार?

मुंबई | Mumbai

भाजप-शिंदे गटासाठी (BJP-Shinde group) पहिली चाचणी असलेल्या अंधेरी पोटनिवडणूक (Andheri Bypoll) गेल्या काही दिवसांपासून खूप प्रकाशझोतात आली आहे. लटकेंचं राजीनामा सत्र ते भाजपचा उमेदवार देण्याच्या घडामोडींमुळे या निवडणुकीने (election) राज्यातील अनेक राजकीय नेत्यांसह नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

- Advertisement -

तसेच राज ठाकरे आणि शरद पवारांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हटलं. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील एकनाथ शिंदेंना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा शरद पवारांनी दाखवला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या अंधेरी पोटनिवडणुकीतील भूमिकेवरुन आभार मानलेत. राज ठाकरे यांच्या पत्राचा विचार करु, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती.

दरम्यान एका बाजुला पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवताना केलेले राजकारण आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजकारणातील काही संकेत यावरुन भाजपची गोची झाली आहे. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिलेला उमेदवार कायम ठेवायचा की मागे घ्यायचा याबाबत भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर रविवारी (१६ ऑक्टोबर) रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीतही लढायचं की माघार घ्यायची? हाच सूर होता. दरम्यान, या बैठकीत निर्णयाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भाजप काय निर्णय घेतो याबाबत उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या