Friday, April 26, 2024
Homeराजकीयशेतकऱ्यांना गत वर्षीच्या खरीप विम्याची रक्कम तातडीने द्यावी

शेतकऱ्यांना गत वर्षीच्या खरीप विम्याची रक्कम तातडीने द्यावी

पुणे |प्रतिनिधी| Pune

शेतकऱ्यांना गत वर्षीच्या खरीप विम्याची रक्कम तातडीने द्यावी. तसेच पीक विमा योजना कंपन्यांच्या हिताऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवावी या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने लाल बावट्यांसह शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढत पुणे कृषी आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन उभं करू असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी राज्य सरकारला दिला.

- Advertisement -

अखिल भारतीय किसान सभाचे राज्य अध्यक्ष कॉ.किसन गुजर, राज्य सचिव कॉ. अजित नवले, ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष कॉ.अशोक ढवळे, कॉ.अजित अभ्यंकर यांच्या नेत्तृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पुणे जिल्ह्यासह मराठवाड्याचे कार्यकर्ते कॉ.अजय बुरांडे यांच्यासमवेत राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी दहा वाजल्यापासून हा मोर्चा सुरू होता. याप्रसंगी मोर्च्याचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधींनी हरीयाणा येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा काळे कायदे असा उल्लेख करत निषेध व्यक्त केला.

यावेळी अजित नवले म्हणाले की, आज राज्यातील लाखो शेतकरी पीक विम्याचे पैसे मिळावेत, यासाठी प्रतिक्षेत आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही. त्यांना केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी वेळ आहे. तसेच राज्यातील सरकार आणि विरोधी पक्ष देखील अस्तित्वात नाही. त्यामुळे आता तरी या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेऊन शेतकर्‍याच्या विमा बाबत निर्णय घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली.

टोमॅटोचे भाव अचानक कोसळल्यामुळे, त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. २० किलोच्या बॉक्सला ५० रुपये भाव मिळत आहे. तर एकराचा उत्पादन खर्च दोन लाख रुपये आहे. यामुळे शेतकरी बरबाद झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांना आपला टोमॅटो जातो. ती निर्यात सरकारी धोरणामुळे प्रचंड विस्कळित झालेली आहे.महाराष्ट्रात टोमॅटोचे उत्पादन जास्त झाले आहे.त्यावर पणन विभागाने इतर राज्याशी चर्चा करून काही तरी हस्तक्षेप करायला पाहिजे होता. मात्र तसे काही झाले नाही.आपल्या राज्यातील पणन विभाग असून नसल्यासारखी अवस्था झाली आहे, असा आरोप नावले यांनी केला.

पणन विभागाला बेजबाबदार मंत्री लाभलेले आहे.त्यामुळे टॉमेटो उत्पादकांचे प्रश्न नेमके काय याचं देखील त्यांना आकलन नाही. टोमॅटो शेतातून तोडून बाजारात आणेपर्यंत देखील पैसे मिळत नाही.त्यामुळे टोमॅटो रस्त्यावर ओतून देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे राज्य सरकारने टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत,अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, देशव्यापी जनआंदोलनाला तयार राहा असे आवाहनही काही प्रतिनिधींनी त्यांच्या भाषणात केलं. केंद्र असो की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहीजे. पीक विमा योजना ही शेतकरी हिताची नसून काही मूठभर विमा कंपन्यांच्या हिताची योजना बनल्याची टीका यावेळी सर्व वक्त्यांनी केली. त्यामुळे कुठलिही योजना ही शेतकरी हिताची जपणूक करणारी असावी असा आग्रह सर्वांनी धरला. दरम्यान, मोर्चा काढताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाच्या नियमांचे पालन केले गेले.

- Advertisment -

ताज्या बातम्या