आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai

मदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी हा निर्णय घेऊ नये, असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार म्हणाले, 'वास्तविक त्यांनी जाहीर करून टाकलं की काही काळात माझ्यावर दोन-दोन गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्या दडपशाहीला या सगळ्या हुकूमशाहीला, पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर होतोय त्याला कंटाळून मी राजीनामा देतोय, अशा पद्धतीने त्यांनी ट्वीट केलं आहे. माझ्या पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की अशाप्रकारे त्यांनी राजीनामा देऊ नये. तसा विचारही त्यांनी मनात आणू नये.'

पुढे बोलताना ते म्हणाले. 'राजकीय जीवनात काम करत असताना ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण काम करतो, शरद पवारांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वाखाली आपण काम करतो आहोत. त्यांनी तर स्वत:च्या राजकीय जीवनात अनेकप्रकारे चढउतार पाहिले आहेत, अनेकप्रकारची स्थित्यंतरं पाहिलेली आहेत. कधी आपण सरकारमध्ये तर कधी विरोधी पक्षात आपण असतो, त्यामुळे अनेक घटना घडत असतात.'

'परंतु ज्याप्रकारे सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात काम करत आहे, एकतरी मध्यंतरी माझ्या स्वत:च्या पाहण्यात आलं, तो चित्रपट बंद पाडण्यासाठी गेले असताना ज्यांना मारहाण झाली, तेच म्हणाले की जितेंद्र आव्हाडांनी मला त्यात वाचवलं. असं असतानाही जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याचं काम झालं. रात्रभर एका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं.'

याचबरोबर, 'कायदा,सुव्यवस्था चांगली ठेवणं सरकारचं काम आहे त्यामध्ये दुमत नाही. प्रत्येक व्यक्तीने संविधानाचा आदर केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर केला पाहिजे, कायद्याचा आदर केला पाहिजे. याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. ' असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.'

कळव्यातील एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या आरोपांमुळे व्यथित झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com