आदित्त्य ठाकरेंच्या आरोपात तथ्य आहे, अजित पवारांनी केले समर्थन

आदित्त्य ठाकरेंच्या आरोपात तथ्य आहे, अजित पवारांनी केले समर्थन

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

मुंबई महापालिकेने शहरातील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर या कामातील गैरप्रकारांबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यात शंभर टक्के तथ्य असल्याचा दावा करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईतील हजारो कोटींच्या कामांसाठी घाई का? असा सवाल केला. मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक आहेत. प्रशासक आणि नगरविकास खात्याची वस्तुस्थिती काय आहे, याबाबत आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले असून यावर महापालिका प्रशासकांचे काय म्हणणे आहे हे मुंबईकरांना कळले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निविदा काढल्या आहेत. या निविदांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी या निविदांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी खोलात जाऊन माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रति किलोमीटर १७ कोटी रुपये खर्च येत नाही. मुंबई हे शहर सात बेटांवर वसलेले आहे. जमिनीखाली मुंबईकरांना सेवा देणाऱ्या ४० प्रकारच्या बाबी आहेत. त्यामुळे रस्त्यांची कामे ताबडतोब होऊ शकणार नाहीत, त्याला काही काळ लागणार आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना महापालिकेला एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? असा सवालही पवार यांनी केला.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मागच्यावर्षी झाला. अर्थसंकल्प मांडून झालेला असताना आता रस्ते कामासाठी इतके कोटी रुपये कुठून आणणार आहात? कोणत्या निधीला कपात लावणार हे कळायला मार्ग नाही. सरकार आले आहे म्हणून घिसाडघाईने सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीट करणार हे ऐकायला कानाला फार बरे वाटते. परंतु ते वास्तवात शक्य आहे का?  मुंबईची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती बघता त्याची अंमलबजावणी होऊ शकते का? असे प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी याप्रकरणी सरकारला आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com