कोणीही टीका करते, त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून - अजित पवार

कोणीही टीका करते, त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून - अजित पवार

पुणे | प्रतिनिधी| Pune

कोणीही टीका करते, त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असते. दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही. नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे-तुरे’ असे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता केंद्रीय लघु उद्योगमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना सुनावले. आपत्तीग्रस्तांना तुम्ही भेटायला गेला होता की अधिकाऱ्यांना, असा सवालही अजित पवार यांनी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे करणे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगताना अजित पवारांनी योग्य भाषा वापरली पाहिजे असे मत मांडले. नारायण राणेंचं सुपूत्र आणि आमदार नितेश राणे यांनी यावर टीका केली होती. कोणती भाषा वापरावी हे अजित पवार यांनी सांगणे म्हणजे राज कुंद्राने कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखे असल्याचा टोला लगावला होता. दरम्यान पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

नारायण राणे यांनी कोकणात पूरपरिस्थितीची पाहणी करताना एका अधिकाऱ्याशी बोलताना मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती. ते संभाषण वृत्तवाहिन्यांवरून लोकांपर्यंत पोहोचले. त्याबाबत अजित पवार यांनी भाष्य केले. एखादी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री जातात त्यावेळी राजशिष्टाचाराप्रमाणे जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतात. नैसर्गिक संकटकाळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात, असेही पवार यांनी सुनावले. जिल्हाधिकारी, मामलेदारांना तुम्ही बघायला आले आहात की नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले आहात, असा संतप्त सवालही पवार यांनी केला.

महाराष्ट्राचा मंगलकलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला. त्यानंतर जी परंपरा महाराष्ट्राला लाभली, तेव्हापासून मोठमोठे लोक राज्याचे प्रमुख झाले. त्यामध्ये वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचा काळ आठवला तर कधीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार त्या काळातील विरोधी पक्षांच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षनेत्यांनी काढले नव्हते, असेही पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com