Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीस, राज्यपाल, अजित आणि पार्थ पवारही एकाचवेळी पुणे दौऱ्यावर!

फडणवीस, राज्यपाल, अजित आणि पार्थ पवारही एकाचवेळी पुणे दौऱ्यावर!

मुंबई Mumbai: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांनी नातू पार्थ पवार parth pawar बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले असून संशयाच्या नजरा आज पवार कुटुंबीय आणि भाजपचे नेते devendra fadnavis राज्यपालांसह पुण्यात असल्याने टवकारल्या गेल्या होत्या! स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण पुण्यात असल्याने उपमुख्यमंत्री अजीत पवार ajit pawar आणि राज्यपालही पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील पुणे दौ-यावर आल्याने सा-यांचे लक्ष लागले होते.

गेल्या दोन दिवसात मुंबईत सिल्वर ओक आणि यशवंतराव चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीच्या जोर बैठकांचे सत्र पार पडले होते. मात्र या बैठका कश्यासाठी आणि त्यात काय निर्णय झाले याबाबत पक्षाकडूनअधिकृत काहीच सांगण्यात आले नाही. तर दुसरीकडे आज पुण्यात पार्थ पवार आपल्या कुटुंबियांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात होते. त्याचवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही पुणे दौऱ्यावर असल्याने राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा निव्वळ योगायोग की नवे सत्तेचे प्रयोग? असा प्रश्न त्यामुळे विचारला जात होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यात होते. राज्यपाल पुण्याच्या विधानभवनात सकाळी ध्वजारोहणासाठी आले होते तर देवेंद्र फडणवीस पत्रकार संघाच्या कोविड सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सकाळीच पुण्यात होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी पुण्यात काही नव्या राजकीय हालचाली होण्याची शंका व्यक्त करण्यात येत होती.

- Advertisement -

दरम्यान, आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या नातू पार्थ पवारांचे कान टोचल्यानंतर वडील अजित पवारांनी सूचक मौन बाळगले आहे. अजित पवार नाराज नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होते. तर हा पवार कुटुंबीयांचा अंतर्गत विषय असून यावर बोलणे योग्य नसल्याचे शिवसेनेसह विरोधीपक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मात्र या घडामोडींनंतर भाजपमध्ये पडद्यामागे हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस-अजित पवार जोडीने गेल्या वर्षी 23 नोव्हेंबरला राजभवनात पहाटेचा शपथथविधी उरकून राजकीय भूकंप केल्याच्या आठवणीतून अद्याप राज्य सावरलेले नाही त्यामुळे आज पुण्यात असणाऱ्या त्रिकूटाने राजकीय निरिक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

दरम्यान, बारामतीत पार्थ पवार कुटुंबियांशी चर्चा करुन काय निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर अजित पवार या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडणार का याबाबतही प्रतीक्षा आहे. स्वातंत्र्यदिनानंतर राजकारणात पुन्हा भूकंप होणार का वादाला कलाटणी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या