
पुणे | Pune
गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांच्या चर्चेचा विषय असलेल्या चांदणी चौक पुलाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. या पुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी, मुख्यमंत्री आणि माझ्यात कोणतंही कोल्डवॉर नाही किंवा मुख्यमंत्री पदावर (Chief Minister Post) डोळा नाही असं विधान केलं. तसेच अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.
अजित पवार म्हणाले की, आता कुठे विरोधी पक्ष झाले आणि त्याना कुठे कोल्ड वॉर दिसलं कुणाला माहिती. एकाला वाटते की या दोन उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदाच्या एका खुर्चीवर डोळा आहे. अरे आम्ही काय बेअक्कल आहोत काय? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा ठेवून कसे चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना? व्यक्ती बसलेली आहे. मला हे खरंतर काढायचे नव्हते. पण काय होते, आम्ही बोललो नाही तर एकच बाजू लोकांना दिसते, दुसरी बाजू दिसत नाही, असा टोला त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांना लगावला.
तर, अलिकडे रुसून गेले, फुगून गेले, तसंच झालं, आता ते काम करत आहेत, राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांचे चांगले काम सुरू आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस होते एका बाजूला, दुसरी बाजू मोकळी होती. मी आता तिथे जाऊन उभा राहिलो. आम्ही दोघंही त्यांच्याबरोबर आहोत. त्यात चुकले काय? राज्याचा सर्वांगिण विकास होत असेल, केंद्रातून नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पैसे देत असतील तर का पैसे घ्यायचे नाहीत? का राज्याचा विकास करायचा नाही? असा प्रश्न यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना देखील सुनावले आहे. दोन दिवसाच्या बातम्या बघा. अजित पवारांनी बैठक घेतली. अरे तुझ्या का पोटात दुखत आहे? बैठक घेतली तर काय? सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस हे देखील होते. ते इंडस्ट्रीच्या मीटिंग घेत होते. मी रिसोर्सेस वाढवण्याची मीटिंग घेत होतो. उद्या आपल्याला पैसा द्यायचा असेल तर टॅक्स व्यवस्थित आला पाहिजे, तिथल्या लिकेजेस थांबल्या पाहिजेत, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच, काही पत्रकारांना हे सुद्धा माहित नसतं. झेंडावंदन कोण करतं. १५ ऑगस्टचं झेंडावंदन हे राज्यपाल करतात. मंत्रालयासमोर १५ ऑगस्टचे ध्वजारोहण मुख्यमंत्री आणि 26 जानेवारीचे राज्यपाल करतात. ही वर्षानुवर्षे परंपरा आहे. पण यांना मात्र अजितदादा झेंडावंदन करणार की चंद्रकांतदादा करणार याचंच पडलं आहे. तुम्हाला काय देणघेण आहे. काही बातम्या काढतात का रे असा सवाल उपस्थित करत उगाच काहीतरी करून गैरसमज करू नका. माहिती नसेल तर माहिती घ्या, अशा शब्दांत त्यांनी प्रसारमाध्यमांनाही फटकारलं.