“'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत...”; बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतर अजित पवार संतापले

अजित पवार
अजित पवार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसंच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. अशात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होतो तेव्हा निषेध कसला करतायत? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अरे ला कारे ने उत्तर द्या असं आवाहन अजित पवारांनी सरकारला केलं आहे.

अजित पवार यांनी म्हंटल आहे की, "मराठीभाषक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारने खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. 'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी. कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी.

केंद्र सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीने सीमाभागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे." अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com