Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या“अरे गोपीचंदा, काय बोलतो...”; अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

“अरे गोपीचंदा, काय बोलतो…”; अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

बारामती | Baramati

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही चांगलं काम केलं आहे पण काहींनी गद्दारी केली. त्यानंतर आमचं सरकार गेल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी केले. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

आता काहीजण गरळ ओकत आहेत. मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महिलांबद्दल गरळं ओकली. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी राज्यपाल चुकीचे बोलले आहेत. अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथळा काढला असे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणतात. अरे गोपीचंदा काय बोलतो? आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.

‘कोणीही सत्तेचा माज करू नये. मागे मंत्री मंगलप्रभात लोढा बोलले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तावडीतून सुटले. शिंदे सुटले कसले, एकनाथ शिंदे पळाले. आधी सुरत मग गुवाहाटी, मग परत रेडा असं ऐकलं त्यानंतर जोतिषाला हात दाखवायला गेले,’ असा टोला अजित पवारांनी लगावला. त्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याची खबर घेतली. ‘आपण शिक्षणाला देणगी दिली म्हणतो. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात भीक मागितली. तुम्ही काय बोलता? तुम्ही आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. त्यामुळं आमची का बदनामी करता?’, असा प्रश्न अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना केला.

तसेच ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अजित पवारांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘आपल्याकडे साखरेला 3 हजार 100 रुपये ते 3 हजार 200 रुपयेचा दर दिला जातो. तीच साखर परदेशात 3 हजार 900 ते 4 हजार रुपयांनी विकली जाते. आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळू देत नाहीत. मागच्या वर्षीची साखर अजूनही शिल्लक आहे. त्याला रोज एक रुपयाचे व्याज लागत असल्याचे पवार म्हणाले.’ त्यात आपल्याकडे येणारे दीड लाख रोजगार निर्माण करणारा कारखाना गुजरातला दिला. ज्या पद्धतीने काम करायचे त्या पद्धतीने सरकार काम करत नसल्याचे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या