
मुंबई | Mumbai
‘फ्रॅक्चर फ्रीडम’ (Fracture Freedom) पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द झाला. त्यावरून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटत असतानाच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचा तिव्र शब्दांत निषेध करत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात साहित्य, कला, संस्कृतींचा नेहमीच आदर, मान ठेवला जातो. अशात अनघा लेले यांना जाहीर झालेला अनुवादाचा पुरस्कार रद्द करणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून राज्यकर्त्यांनी कधीही साहित्यात हस्तक्षेप केला नाही. यासंदर्भात जाणकारांनीच निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा असते. आणीबाणीच्या काळात राज्यकर्त्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची किंमतही राज्यकर्त्यांनी मोजली. आता देखील शिंदे-फडणवीस सरकारकडून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतोय.
तसेच, कोबाड गांधी पुस्तकाचे लेखक यांना 2009 रोजी अटक पोलिसांनी केली होती तेव्हा पुरावे होते म्हणून केले असावे. गृह विभागात आम्ही हस्तक्षेप करत नाही. विचारांची लढाई विचारांनी करा. एक पुरस्कार रद्द करताय पण इतर देखील कामं रद्द करत आहात. त्यांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नाही? सरकारसाठी ही गोष्ट लांच्छानास्पद आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी संस्कृतीचा पाया मजबूत केला. साहित्य, क्रीडा कोणतंही क्षेत्र असेल त्यात राजकारण आणू नये. त्यातून देशद्रोहच काम असेल, नक्षलांचं काम असेल तर मग त्याला विरोध करा. ते पुस्तक एक अनुवाद आहे. हे लंगड समर्थन आहे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान यशवंतराव चव्हाण वाड्मय पुरस्कारांमधील फ्रॅक्चर फ्रीडम या कोबाड गांधी लिखित पुस्तकाला प्रौढ वाड्मय अनुवादित श्रेणीत पुरस्कार जाहिर झाला होता. मात्र या पुस्तकामध्ये नक्षलवादाचे समर्थन करण्यात आले आहे असा ठपका ठेवून तो पुरस्कार परत घेण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या साहित्यिकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाहीतर महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळाच्या सदस्य मंडळानं राजीनामा दिला आहे. त्यामध्ये डॉ. प्रज्ञा दया पवार, कवयित्री नीरजा यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच भुरा या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक शरद बावीस्कर यांच्याही पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांनी सध्या निर्माण झालेल्या वादामुळे तो पुरस्कार परत करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे साहित्यिक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.