...तर मुख्यमंत्री कशाला पाहिजे ? - अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी सगळे अधिकार मुख्य सचिवांना देऊन घरी बसावे
अजित पवार
अजित पवार

पुणे |प्रतिनिधी| Pune

“लोकानी निवडून दिलेल्या आमदाराला अधिकार द्यायचे नाही, मंत्री करायचं नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं. मंत्री नाही म्हणून राज्यातील काम थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना दिलें आहेत. सगळेच काम सचिव करत असतील तर, मुख्यमंत्री कशाला पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी सगळे अधिकार मुख्य सचिवांना देऊन घरी बसावे अशी असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाही, मंत्रिमंडळचा विस्तार नाही. प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना माध्यमांकडून याबाबत विचारलं जातं, तेव्हा फक्त लवकरच….लवकरच.. एवढेच शब्द त्यांच्या तोंडून निघतात. होईल…, होईल… अरे पण कधी होईल?” असा उपरोधिक सवालही अजित पवार यांनी केला आहे. राज्यात अशी वेळ आज पर्यंत मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर कुठल्याही मुख्यमंत्र्यावर आली नाही. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ही वेळ आली हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. पक्षाच्या विविध कामासाठी तसेच पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात ते पुण्यात आले होते. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे-फडवणी सरकार यांवर टीका केली.

राज्यात अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ असते. आता मंत्र्यांनीच सर्व अधिकार सचिवांना दिले आहेत त्यामुळे आमदारांची मंत्रीमंडळाची राज्यात गरज नाही असा चिमटा त्यांनी शिंदे-भाजप सरकारला काढला आहे.

राज्यामधील विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्याकडे सुद्धा अनेक लोक कामे घेऊन येतात. परंतु या कामाचा पाठपुरावा कुठे करायचा असा प्रश्न आहे. अनेक अधिकाऱ्यांना मी बोलतो, परंतू मंत्री नसल्यामुळे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ होणं गरजेचे आहे. तसेच आम्ही राज्यपालांना भेटलो त्यावेळी हेच सांगितले की, लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे असे पवार म्हणाले.

नवीन सरकार स्थापन होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. दिल्लीवारी केल्याशिवाय मंत्रीमंडळासाठी ग्रीन सिग्नल मिळणार नाही आणि मंत्रीमंडळ अस्तिवात येत नाही, हे स्पष्ट आहे.”

महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे मोठे प्रश्न निर्माण होतात. अतिवृष्ट होती, विविध संकटं येतात, वेगवेगळ्या घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. सध्या प्रवेश सुरू झाले आहेत, त्या संदर्भात पालकांसमोर काही अडचणी आहेत. विद्यार्थ्यांसमोर काही प्रश्न आहेत. निर्णय घेणार कोण? आम्ही दोघे आहोत आम्ही दोघे आहोत पण दोघे पुरू शकतात का? याचं तरी आत्मपरीक्षण करा.” असंही पवार म्हणाले.

“मला त्या दोघांवर टीका करायची नाही. परंतु वस्तूस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आज ते घडत नाही याचा जबरदस्त फटका महाराष्ट्राला बसतो आहे. याचं पण तारतम्य, भान या लोकांना राहिलेलं नाही. आज यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतून जेव्हा सिग्नल मिळेल त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तोपर्यंत कितीही गप्पा मारल्या तरी यांच्या हातून काहीही घडणार नाही, हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आहे. पूर्वीच्या काळात मात्र काँग्रेस आणि शिवसेनेत निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रात व्हायचे, मुंबईत व्हायचे. दिल्लीत निर्णय होत नव्हते. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जी परंपरा महाराजांनी चालू ठेवली होती, त्याला कुठंतरी आता बाजूला सारण्याचं काम होतं आह, याची पण नोंद सर्वांनी घेतली पाहिजे.” अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे असताना एकनाथ शिंदे शिस्तीने वागायचे

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते.त्यावेळी ते रात्री १२ नंतर हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. हे योग्य नसून कायद्याच पालन केले पाहिजे. तसेच रात्री १० नंतर माईक बंद असणे गरजेचे आहे. पण यांचा माईक रात्री २ पर्यंत चालू असल्याचं दिसून आलं आहे. पण यांना माईक बंद करायचं ते कळत नाही? तसेच उद्धव ठाकरे असताना एकनाथ शिंदे शिस्तीने वागायचे, मात्र आता वेगळेच पाहायला मिळत आहेत. कायदे, नियम करणारे राज्यकर्ते नियम मोडत असतील तर असाही बोलणारा वर्ग असतो. ” असंही यावेळी अजित पवारांनी बोलून दाखवलं.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत

“मावळमध्ये नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर पीडितेचा गळा कापला. त्या निष्पाप मुलीला जगातून जावं लागलं. या सगळ्यावर चाप ठेवायला मंत्रीमंडळ असले पाहिजे, हे बघायचं कोणी? माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत. दरारा असला पाहिजे. प्रशासनातील कमांड असली पाहिजे. या करिताच यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली का?” असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com