“मुख्यमंत्र्यांचे चहापानाचे बिल दोन कोटींपेक्षा जास्त, त्यात काय…”; अजितदादा भडकले

“मुख्यमंत्र्यांचे चहापानाचे बिल दोन कोटींपेक्षा जास्त, त्यात काय…”; अजितदादा भडकले

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याचं ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आलेलं आहे. प्रसारमाध्यमांनी तशा बातम्या दिलेल्या आहेत. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी सुरु असलेल्या खर्चावर भाष्य करत टीकास्त्र सोडले आहे.

वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. सोमवारपासून, राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी आज, विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली.

अजित पवार बोलतांना म्हणाले, स्वतःचे हसरे फोटो दाखवण्यासाठी कोटींच्या जाहिरातींचा घाट घालतात. जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च सुरुय. वर्षा बंगल्याच्या खानपानाचं बिल अडीच कोटी येतय. चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का? असा संतप्त पवार यांनी केला. तसेच, गेल्या ८ महिन्यात जाहिरातींवर सरकारकडून ५० कोटी खर्च करण्यात आला आहे. आणि मुंबई महापालिकेकडून माहिती घेतली तर तिथून १७ कोटी रुपयेंपेक्षा जाहिरातींवर खर्च केला आहे. जाहिराती देऊन स्वतःचा टेंबा मिळवण्याचं काम सुरु आहे. अशी टीका अजित पवार यांनी केली.

विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. एक महिना तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाहीये. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

तसेच, ग्रामीण भागातील विकासासाठी दिला जाणारा निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे खर्चाअभावी हा निधी परत जाणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. मात्र तिजोरीचा विचार न करता, केवळ मंत्री आणि त्यांच्या आमदारांच्या मतदाररसंघात कोट्यवधींची कामे जाहीर करण्यात आली. मात्र तेवढा निधी सरकारकडे नाही. ही लोकांची फसवणूक आहे, अशी टीका अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com