महापशुधन एक्सपोच्या मैदानात कृषीमंत्री सत्तारांची राजकिय फटकेबाजी
राहाता | तालुका प्रतिनिधी
मैदान पशुधन एक्सपोचे, अन त्या मैदानावर कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी राजकिय फटकेबाजी केली. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कामांचे कौतुक करत त्यांनी उपस्थितांमध्ये हस्याचे फवारे ही उडविले.
महापशुधन एक्सपो 2023 चे उद्यघाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विखे पाटील यांच्या राजकिय उंची विषद केली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात एक्स्पो मैदानावर खुप काट्या होत्या, त्या साफ केल्या. त्यांच्या या मुद्यावर टिप्पणी करतांना ना. सत्तार म्हणाले, राजकारणात तुम्ही अनेकांना अनेक वेळा साफ केले. त्यामुळे तुम्हाला ग्राउंड साफ करणे अवघड नाही.
प्रदर्शनात उस्मानाबादी, संगमनेरी शेळी आहे. संगमनेरी घोडा असल्याचे त्यांनी सांगितले. घोडा कुठलाही असो, पण लगाम विखे पाटलांकडेच असतो, असे म्हणताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. ज्याला लगाम धरता येते त्यांनीच घोडा खरीदी करावा. सभागृहत आपण काहीही बोललो तर त्याचा बाऊ केला जातो. राजकारणात आपण पुढे आलो त्याचे श्रेय त्यांनी अशोक चव्हाण व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. सिल्लोड नगर पालिकेत विखे पाटलांनी भाषण केले. सत्तारांच्या ताब्यात सत्ता द्या, त्यांनी मंत्री करु. त्यानंतर सिल्लोड मध्ये 30 पैकी 27 नगरसेवक निवडूण आले आणि आपण सात दिवसात मंत्री झालो. ही आठवणही त्यांनी सांगितली. सबका मालिक साईबाबा आहेत, हमारे मालिक विखे पाटील असल्याचे ही ते म्हणाले.
आपण कृषी मंत्री झालो, काही अडचण आली तर विखे पाटलांकडे जातो. ना. विखे पाटील उत्कृष्ट नेते आहेत. या भागातील लोक भाग्यवान आहेत, त्यांना विखे पाटलांसारखे नेतृत्व लाभले. विखे पाटील व माझ्या मैत्रीत कधीही गॅप येवु दिला नाही. आमचे मागील मुख्यमंत्री (उध्दव ठाकरे) यांनी विखे पाटलांचा जादा संपर्क नको, असे सांगुन संपर्क कमी करण्याची सुचना केली होती. परंतु आम्हाला परिवर्तन होणार हे माहिती होते. त्यामुळे मैत्रीत गॅप येवु दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विखे पाटलांच्या एका फोन मध्ये आपण या कार्यक्रमाला आलो. असे सांगत त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन केले. आपण जालना येथे कृषी प्रदर्शन घेतले होते. त्याही पेक्षा अतिशय चांगले प्रदर्शन असल्याचे ना. सत्तार म्हणाले.