शासन शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे !

कृषिमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन, सोंडले येथे शेतकर्‍यांशी साधला संवाद
शासन शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शेतकर्‍यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबध्द असून शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या संपर्कात राहत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी दूर कराव्यात.

तसेच पात्र शेतकर्‍यांना विहित कालावधीत योजनांचे लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी दिले.

कृषी विभागातर्फे सोंडले, ता.शिंदखेडा येथे आज रिसोर्स बँक शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा, पिक पाहणी आणि अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस. डी. मालपुरे, तहसीलदार सुनील सैंदाणे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, जी. के. चौधरी, सोंडलेच्या सरपंच मंगलबाई पवार आदी उपस्थित होते. यावेळी श्री. भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलतांना ना. भुसे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रास भेट देत आहे. धुळे जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची तूट आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर पर्यायी उपाययोजनांसह बी- बियाणे, रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता राहील, असे नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. आता शेतकर्‍यांनीही कमी कालावधीत येणारी पिके घेण्यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ठिंबक सिंचनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कालबध्द विशेष अभियान राबवावे. एमआरईजीएस योजनेंतर्गत राज्यात 38 हजार हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली आहे. या वर्षी 60 हजार हेक्टर क्षेत्राचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी फळबाग लागवडीकडे वळावे. सेंद्रीय शेतीचे मानांकन, प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे.

त्याची कार्यवाही सुरू असून लवकरच अंमलबजवाणी करण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपनी, गटशेती, प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कार्यवाही करावी. नियमितपणे कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेचाही शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ना. भुसे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत निर्धारित उद्दिष्टाची पूर्तता करावी. या योजनेंतर्गत रोपवाटिका कार्यान्वित कराव्यात. शेतकर्‍यांना पिक कर्जाचा वेळेत पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी नियमितपणे आढावा घ्यावा, असेही निर्देश श्री. भुसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतांनाही पाचशे कोटी रुपयांचे पिक कर्ज वितरण झाले. यावर्षीही पीक कर्ज वितरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्‍यांच्या विकासासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी शेतीबरोबरच कृषी प्रक्रिया आधारित उद्योग आणि पूरक व्यवसाय सुरू करावेत, असेही त्यांनी सांगितले. श्री. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com