Thursday, April 25, 2024
Homeजळगावकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक विश्लेषण : महाविकास आघाडीचा डंका अन्...

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक विश्लेषण : महाविकास आघाडीचा डंका अन् युतीला धोक्याची घंटा!

सध्या राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची सत्ता असल्याने युतीला सर्वाधिक जागा मिळून सत्तेचे सोपान सर करता येईल, अशी आशा कार्यकत्यांना लागून होती. मात्र, जिल्ह्याचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच युतीच्या हातून निसटली आहे. या निकालाने महाविकास आघाडीचा डंका वाजल्याने युतीसाठी ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुरेशदादा जैन पुरस्कृत शिवसेनेची सत्ता कायम होती. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सर्वपक्षीय पॅनल बनवून जळगाव कृउबा समितीवर शिवसेनेचा सभापती राहिलेला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे प्रकाश नारखेडे हे वगळता शिवसेनेचे सभापती झालेले आहेत. मात्र, यावर्षीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आमने-सामने लढत रंगली. यात युतीचा बोलबाला अधिकच असल्याने सर्वाधिक जागा युतीच्या येतील, असा कयास असताना मतदारांनी मात्र, हा दावा फोल ठरवित महाविकास आघाडीला सर्वाधिक 11 जागांवर विजय मिळवून देत युतीचा टांगा पलटी घोडे फरार अशी गत मतदारांनी करुन टाकली आहे.

ग्रामीण भागातील मिनी विधानसभा असलेल्या जळगाव कृउबा समिती ही दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांसाठी महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीचा पाया ग्रामीण भागातूनच रचला जात असून यात युतीचे पानिपत होऊन महाविकास आघाडीने एक हाती सत्ता काबीज केल्याने युतीला ही आगामी निवडणुकीसाठी धोक्याची घंटा आहे. त्यादृष्टीने भाजप-शिवसेना शिंदे गटाने आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

- Advertisement -

शिवसेना फुटीचे ग्रहण

राज्यात शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट अशी विभागणी झालेली आहे. त्याचे पडसाद देखील जिल्ह्याच्या राजकारणावर पडलेले आहे. तसेच भाजपालाही या निवडणुकीत आसमान दाखविले आहे. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता ग्रामीण भागात धरणगाव वगळता जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला बाजार समित्यांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दमछाक होत असून हे ग्रहण अजून किती काळ राहील, याविषयी येणारा काळच सांगू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या