“अजितदादा, बऱ्याच दिवसांनी तुम्ही योग्य जागी आलात, पण..”; अमित शहाचं पुण्यातील जाहीर कार्यक्रमात मोठं वक्तव्य

“अजितदादा, बऱ्याच दिवसांनी तुम्ही योग्य जागी आलात, पण..”; अमित शहाचं पुण्यातील जाहीर कार्यक्रमात मोठं वक्तव्य

पुणे । Pune

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आज पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला, असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केले.

अमित शहा म्हणाले, अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा , आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात. अमित शहा पुढे म्हणाले, 'सहकार विभागाच्या माध्यमातून पोर्टल आपण आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीकडेच संकल्प घेतला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात ६० कोटींहून अधिक गरीब लोकांना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मदत केली आहे. गरीबांच्या इच्छा गेल्या ७० वर्षात पूर्ण झाल्या नव्हत्या. पण पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कालावधित सगळं काम करून टाकलं आहे. गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा मोदींनी पूर्ण केल्या आहेत, असे अमित शहा म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यापूर्वी २०१९ मध्ये भाजपसोबत आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. या सर्व घडामोडींमागील चाणक्य अमित शहा असल्याचे त्यावेळी म्हटले जात होते. परंतु शरद पवार यांनी चक्र फिरवली अन् अजित पवार काही तासांत पुन्हा स्वगृही आले. तिच आठवण अमित शहा यांनी अजित पवार यांना तर करुन दिली नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com