“ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी...”; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

“ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी...”; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याने विविध चर्चा रंगल्या. अजित पवार गटाच्या समावेशानंतर शिंदे गट नाराज असल्याचे सातत्याने बोलले जात होते. वर्षभरापूर्वी अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याने सत्तेबाहेर असल्याचे शिंदे गटाने म्हटले होते.

पण अखेर शुक्रवारी जाहीर झालेल्या खातेवाटपात अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळाले. नवनियुक्त मंत्र्यांच्या खात्यांच्या वाटपासोबतच विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. राज्यपाल रमेश बैस यांच्या मान्यतेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खात्यांच्या वाटपाची घोषणा केली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांनाही वजनदार खाती मिळाली आहेत. मात्र शिंदे गटाच्या आमदारांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.

या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. "चला,अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खाते वाटप झालं. पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला.आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची खरी किंमत काय आहे, हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजप ने ३३ देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!" असं ट्विट करत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचलं आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीदेखील खातेवाटपावरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.खासदार संजय राऊत म्हणाले, अर्थ खातं जर अजित पवारांना द्यायचा नसेल तर अर्थखाते तुमच्याकडे घ्या अन् अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद द्या, अशा प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे हे मागे फिरले, असा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच, अर्थ खातं अजित पवारांना दिलं गेलं. भाजप नेतृत्वाने शिंदे गटाचं काहीही एक ऐकलेलं नाही. सरकारमध्ये राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा, अशा शब्दांमध्ये दिल्लीतून मुख्यमंत्र्यांना आदेश दिला गेला, अशी माझ्याकडे पक्की माहिती आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com