
मुंबई | Mumbai
विधानसभेत भाजपा आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.
मात्र शिवसेनेत व्हिपवरुन संघर्ष निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता. बंडखोर शिंदे गटाने शिवसेनेच्या व्हिपविरोधात मतदान केलं आहे. या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
'शिवसेनेची कोर्टात लढाई सुरु आहे, आमचा व्हीपच खरा व्हीप आहे, हे कोर्टात आम्ही सिद्ध करु. जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती. मात्र शिवसेना कधीही संपणार नाही. सध्या सर्व आमदार एका बबलमध्ये राहतायेत. कधी गोवा, कधी सूरत तर कधी गुवाहाटी येथे ते राहतायेत. मात्र त्यांना कधीतरी त्यांच्या मतदारसंघात जावं लागेल. तेव्हा मतदारांचं म्हणणं काय आहे त्यावेळी काही स्पष्टता येईल,' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.