निकृष्ट कामापेक्षा ठेकेदाराचे बिल थांबल्याचे दु:ख
राजकीय

निकृष्ट कामापेक्षा ठेकेदाराचे बिल थांबल्याचे दु:ख

तपोवन रस्त्याच्या कामावरून कळमकर यांचा आरोप

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

तपोवन, बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत शिवसेनेनेे सर्वप्रथम आवाज उठवून राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यामुळे सरकारने तातडीने चौकशी समिती नेमली. यादरम्यान ठेकेदाराचे बिलही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांनी पूर्णपणे चुकीचे आरोप करून थयथयाट चालवला असल्याचा आरोप माजी महापौर तथा शिवसेनेचे नेते अभिषेक कळमकर यांनी केला आहे.

तपोवन व बोल्हेगाव रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी व तपासणी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेच्या वतीने कळमकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कळमकर म्हणाले, मोठा गाजावाजा करून रस्त्याचे उद्घाटन, कामाच्या पाहणीचा फार्स करणार्‍यांनी वेळीच आवाज उठवला असता तर तपोवन रस्ता दर्जेदार झाला असता.

परंतु, त्यांच्या दृष्टीला स्वत:च्या वैयक्तिक फायद्यापलीकडे काहीच दिसत नाही. त्यांचे हे पितळ अवघ्या काही दिवसांतच उघडे पडल्याने आता जनतेचा आवाज बनून कार्यरत असलेल्या शिवसेनेवर केविलवाणे आरोप केले जात आहेत. शिवसेनेने जनतेच्या आवाजाला वाट करून दिली असून त्यांना जनतेशी देणेघेणेे नसल्याने त्यांना जनतेचा आवाज कल्ला वाटणे स्वाभाविकच आहे, अशी टीका कळमकर यांनी केली.

विरोधकांना सर्वात जास्त दु:ख ठेकेदाराचे बिल थांबवल्याचे झाले आहेे. लोकांनीही त्यांचा कावेबाजपणा व खाबूगिरीची वृत्ती ओळखली असल्याने आता सारवासारव करण्यासाठी शिवसेनेकडे बोट दाखविले जात आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तपोवन व बोल्हेगाव रस्त्याचे काम पुन्हा सुरु होवून ते दर्जेेदार होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही.

कोणाला आपल्या वार्डात इतरांनी येवून गैरप्रकार उघडे करू नये असे वाटत असले तरी आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे असल्याने शिवसेना नेहमीच याहीपेक्षा मोठा आवाज उठवत राहील. नागरकरांचे रस्त्याबाबत समाधान होईपर्यंत ठेकेदाराला बिल अदा करू नये अशीच शिवसेनेची भूमिका राहील, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या 25 वर्षांच्या आमदारकीचा हिशोब विरोधक मागत असतात. परंतु विद्यमान आमदारांची पाच वर्षांची वैयक्तिक प्रगती पाहता त्यांना संपत्तीची अदलाबदल करण्याचे आव्हान यापूर्वीच राठोड यांनी दिलेले आहे. तपोवन रस्त्यासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आमदार असतानाही निधी दिला होता. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यावर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com