
दिल्ली | Delhi
दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यात आरोपी असलेल्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज राउज अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आज त्यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनिष सिसोदिया यांच्यसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
सिसोदिया यांना तिहारमध्ये ठेवण्यात येणार आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांनी सिसोदिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तथापि, सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, सीबीआय सिसोदियांच्या पुढील कोठडीची मागणी सध्या करणार नाही, परंतु पुढील 15 दिवसांत पुन्हा कोठडी मागू शकते.
सीबीआयनं मीडियात सुरू असलेल्या बातम्यांवर आक्षेप घेत, तुम्ही या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचं म्हटलंय. एकीकडं हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना दुसरीकडं सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचं बोललं जातंय. सिसोदिया यांना तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर व्हायचं आहे का? अशी विचारणाही न्यायालयानं केलीय.
सिसोदियांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर मनीष सिसोदिया यांनी भगवत गीता, डायरी, पेन देण्याची मागणी केलीय. त्याचबरोबर सिसोदियांना औषधं घेऊन जाण्यास परवानगी दिलीय.