लवकरच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

बैठकीला राज ठाकरे यांना निमंत्रित करणार
लवकरच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

प्रार्थना स्थळांवरील भोंग्याच्या ( Loudspeakers ) मुद्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच विरोधी पक्षाचे नेत्यांसह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची बैठक (Meeting of all party political leaders ) गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil )यांनी बुधवारी येथे दिली. या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांनाही निमंत्रित करण्यात येणार असून सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. संघर्ष वाढवू नका, तेढ निर्माण करू नका. अशी कृती कुणाकडून झाली, तर त्याबाबत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला.

मशिदींवरील भोंग्यावरून राज्यातील वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमजान ईदनंतर म्हणजे ३ मेनंतर मशिदींवरील बेकायदा भोंगे काढले नाहीत तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना प्रार्थना स्थळांवरील भोंग्याबाबत एकत्रित धोरण तयार करण्याची सूचना केली होती.

त्यानुसार वळसे-पाटील यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक रजनीश शेठ उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले, राज्यात लाऊडस्पीकरचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी काल बैठक घेऊन त्याचा अहवाल दिला. येत्या काही दिवसांत राज्यात जी परिस्थिती उद्भवू शकते, त्याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काय तयारी केली, याबाबतची माहिती त्यांनी मला दिली.

राज्यात भोंग्याचा मुद्दा हा काही नवीन नाही. यासंदर्भात २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. त्यानंतर २०१५ आणि २०१७ साली काही शासन निर्णय निघाले. त्यात अशा प्रकारच्या लाऊडस्पीकरच्या परवानगीची पद्धत ठरवून दिली आहे, असे वळसे-पाटील म्हणाले.

पोलिसांची परवानगी घेऊनच लाऊडस्पीकर लावायला हवेत. ज्यांना तशी परवानगी नाही, त्यांना हे लाऊडस्पीकर लावता येणार नाही. जे लाऊडस्पीकर लावतील, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्णयाच्या आधारे आणि राज्य सरकारने काढलेल्या शासन आदेशानुसार लावावेत. सरकारने कुठला लाऊडस्पीकर काढायचा किंवा लावायचा याबाबत प्रश्न उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज यांच्या सभेबाबत औरंगाबाद पोलीस निर्णय घेतील

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे १ मे रोजी जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या सभेला परवानगी नाकारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह इतरांनी केली आहे. राज यांच्या सभेमुळे औरंगाबादमधील वातावरण अधिक तणावाचे होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावर बोलताना वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या सभेबाबत औरंगाबाद पोलीस स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असे सांगितले.

Related Stories

No stories found.