सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे षडयंत्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे षडयंत्र

मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे. परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए आदी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केला.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देत असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे आता पर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले असून आताही त्यांचा कुटील डाव यशस्वी होणार नाही. आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याची व्यक्त केलेली इच्छा आणि काँग्रेस- राष्ट्रवादीवर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी भाजपवर टीका केली. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास देत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भाजप महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजप त्रास देत असून हा भाजपचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपाला पहावत नसून त्यांची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असा आरोप पटोले यांनी लगावला.

प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे. भाजप विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न आहेत. परंतु या दबावतंत्रामुळे भाजपचे सत्तेचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार, असा टोला पटोले यांनी लगावला.

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भारतीय जनता पक्षाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com