Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

नाशिक । फारुक पठाण Nashik

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक राजकीय भूकंप झाले. पहिल्यांदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापना केली. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आणून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर आता दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बंड करून शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सत्तेत सामील झाले. असे अनेक राजकीय भूकंप घडत असताना आता पुन्हा एक मोठा भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे अजित पवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची.

- Advertisement -

काल उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार या दोघा उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सूचक ट्विट करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. लवकरच अजित पवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे त्यांनी म्हटलेे. त्यांच्या ट्विटला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नरेश म्हस्के यांनीदेखील उत्तर देत दमाने घेण्याचा सल्ला दिला. वाढदिवसाच्या दिवशी अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणूनदेखील अजित पवारांचे शुभेच्छा फलक लावले गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात आणखी नवीन भूकंप होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याची अनेक कारणेही चर्चेत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मागील काही काळापासून शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वार्‍या वाढल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्याप्रमाणे त्यांना वाटा मिळाला पाहिजे होता तसा वाटा मिळाला नाही, विशेष म्हणजे अर्थखाते अजित पवारांकडे नको असा हट्टदेखील शिवसेनेच्या वतीने धरण्यात आला होता, मात्र 105 आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थखाते थेट अजित पवारांकडे गेले. असे प्रसंग घडत असतानाच योगायोगाने काल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता अन् मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाणार असल्यामुळे त्यांनी आधल्या दिवशी शुक्रवारीच सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा देऊन ते दिल्लीला रवाना झाले.

मात्र दुसरे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचाही वाढदिवस असताना त्यांना मात्र शुभेच्छा दिल्याचा एकही फोटो किंवा व्हिडिओ बघायला मिळाला नाही. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या काळात तीन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला होता. अशा अनेक घटना सतत घडत असल्यामुळे सध्याच्या राजकीय वातावरणात काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निकालाकडे लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांविरुद्ध दाखल तक्रारीचा निपटारा होणे बाकी आहे. या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष लवकरच निकाल देणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्षाकडे सत्तेसाठी अपेक्षित आमदार संख्या असतानाही अचानक राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री करून थेट उपमुख्यमंत्री पद व एकूण नऊ मंत्रिपदे देण्यात आल्यानंतर शिंदे गटाचे काय होणार अशी चर्चा तेव्हापासून सुरू झाली आहे. तर आता सरकारमध्ये अजितदादांचे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा वाढत असल्यामुळे ते मुख्यमंत्री होणार का? अशीदेखील चर्चा सुरू झाली आहे. असे झाले तर राज्याला पुन्हा एक नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या